तरूणाईने घरी कुटुंबीय वाट पाहत आहेत याचे भान ठेवावे : नगराध्यक्ष सिद्धी

पणजी : पावसाळी सहलीचा आनंद घेण्यासाठी मित्रांसोबत बेळगावहून आलेला २० वर्षीय आदित्य दीपक कुमार सत्पती काल सुर्ला येथे बाराजण धबधबा येथे पाण्यात बुडाला होता. आज सोमवारी शोधमोहीमेत अखेर त्याचा मृतदेह सापडला. या युवकाच्या अकाली निधनाचा मोठा धक्का त्याच्या कुटुंबियांना बसला आहे. नौदल अधिकाऱ्यांचा मुलगा असलेला आदित्य लग्नानंतर १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जन्माला आला होता. त्यामुळे घरातील सर्वांचाच लाडका होता. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबीय दु:खाच्या सागरात बुडाले आहेत.
बरसणाऱ्या पावसात धो धो कोसळणारे धबधबे व त्यांचे आकर्षण जीवघेणे ठरू लागले आहे. दुधसागर येथे नदीत तिघांनी जीव गमावल्यानंतर गेल्या काही दिवसांतील ही तिसरी घटना आहे. त्यात आदित्य हा युवक जीव गमावून बसला. रविवारी विर्डी-दोडामार्ग येथे वझरा खालील धबधब्यावर गेलेले सहा युवक नदीची पातळी वाढल्याने तेथेच रानात अडकून पडले. स्थानिकांच्या मदतीने अग्नीशमन दलाने त्यांना सुखरूप बाहेर काढले.
बाराजण धबधब्याच्या परिसरात मुसळधार पावसामुळे वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात तो बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी काल उशीरापर्यंत प्रयत्न करण्यात आले होते. मात्र अंधार आणि वेगवान प्रवाहामुळे शोधमोहीम स्थगित करण्यात आली होती. सोमवारी सकाळी पुन्हा संयुक्त शोधमोहीम राबविण्यात आली असता त्याचा मृतदेह सापडला.
१५ वर्षांनंतर आदित्यचा जन्म
या घटनेत सर्वाधिक हळहळ व्यक्त होत आहे ती आदित्यच्या कुटुंबासाठी. माहितीनुसार, आदित्य हा लग्नानंतर तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झाला होता. त्याचे वडील निवृत्त नौदल अधिकारी असून कुटुंब सध्या बेळगाव येथे वास्तव्यास आहे. १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर घरात आलेल्या मुलावर काळाने असा घाला घातल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रविवारी दुपारी आदित्य आपल्या मित्रांसोबत सुर्ला येथील धबधब्यावर गेला होता. धबधब्यावर जाण्यास मज्जाव करण्यात आला असतानाही मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी पोहोचले होते. पाण्यात उतरलेल्या आदित्यचा तोल जाऊन तो खोल डोहात बुडाला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा प्रचंड वेग आणि खोलीमुळे त्यांना यश आले नाही. शेवटी आज त्याचा मृतदेह सापडला.
तरूणाईने घरी कुटुंबीय वाट पाहत आहेत याचे भान ठेवावे : नगराध्यक्ष सिद्धी
रविवारी विर्डी-दोडामार्ग येथे वझरा खालील धबधब्यावर गेलेले सहा युवक नदीची पातळी वाढल्याने तेथेच रानात अडकून पडले. दुपारी गेलेले युवक रात्री उशीरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबीय घाबरून गेले. युवकांनी व्हिडीओ काढून माहिती दिल्यानंतर अग्निशमन दल व स्थानिकांनी एकत्र येऊन शोधमोहीम राबवत त्यांना सुखरूप बाहेर काढले. साखळीच्या नगराध्यक्ष सिद्धी प्रभू पोरोब यांचा मुलगाही त्यात होता. त्यांनी यासंदर्भात खास व्हिडीओ काढून आपली झालेली कठीण स्थिती कथन केली आहे.
युवकांनी पावसाळ्यात नदी, धबधब्यावर जाऊ नये; आपल्या पालकांचे ऐकावे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांची माहिती देत; घरी आपले कुटुंबीय वाट पाहत आहेत, याचे भान ठेवावे असे भावनिक आवाहन आजच्या तरुणाईला केले आहे. पाणी व आग याकडे माणूस खेळू शकत नाही. त्यामुळे नाहक आपला जीव संकटात टाकू नये, असे आवाहन केले आहे.