राज्यात पावसाला दमदार सुरुवात, तर बागा, कुळे येथे बुडून मृत्यूच्या घटना

पणजी : पावसाने या आठवड्यात दमदार सुरुवात केली असून सत्तरी, बार्देश, फोंडा, डिचोली, तिसवाडी, काणकोणसह अन्य ठिकाणी पडझडीच्या घटनांची नोंद झाली. इंदिरानगर करासवाडा म्हापसा येथे एका भाड्याच्या खोलीत राहणार्या सोनुर्ली-सावंतवाडी येथील जाधव कुटुंबातील पिता व पुत्राचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. कुळे येथे दूधसागर नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. याशिवाय फसवणूक, चोरीच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार
साळगावकर समूहाची १,०२३ कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत अनिल साळगावकर (एव्हीएस) समूहाशी संबंधित गोव्यातील बेकायदा लोहखनिज खाण प्रकरणात सुमारे १,०२३.८५ कोटी रुपयांच्या चल व अचल मालमत्तांवर तात्पुरती जप्ती आणली आहे. १९ जून २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
दूधसागर नदीत बुडून दोघांचा मृत्यू
तांबडीमळ- कुळे येथे रविवारी सकाळी दूधसागर नदीवर आंघोळीसाठी गेलेले ओंकार डेंडीन (१७) व सागर डेंडीन (१७) या दोघांचा बुडून मृत्यू झाला. ओंकार डेंडीन याचे कुटुंबीय गेल्या काही वर्षापासून कुळे परिसरात राहतात. तर सागर डेंडीन यांचे कुटुंबीय बागलकोट येथे राहत आहेत.
पर्वरी येथे घराला भीषण आग लागून ७ लाखांचे नुकसान
पर्वरी येथील हाऊसिंग बोर्ड परिसरात राहणाऱ्या आशा सप्रे यांच्या घराला रविवारी दुपारी भीषण आग लागून सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाले. पर्वरी आणि पणजी अग्निशमन दलाच्या जवानांनी संयुक्तपणे वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
सोमवार
थारचा अपघात; पती, बहिणीसह गिरीच्या पंच ठार
मावशीला घरी सोडण्यासाठी कणकवली येथे निघालेल्या गिरी येथील नानोडकर कुटुंबियांच्या थार वाहनाचा नेमळे-सावंतवाडी येथील महामार्गावर भीषण स्वयंअपघातात झाला. गाडी रस्ता सोडून खोल भागात कोसळल्याने श्रीमती पांडुरंग नानोडकर (५८), त्यांचे पती पांडुरंग विष्णू नानोडकर (६५) व त्यांची सख्खी बहीण विलासिनी जगन्नाथ सातार्डेकर (५४, रा. भिरवंडे-कणकवली) यांचा मृत्यू झाला. मुलगा सनी नानोडकर (३६) व उज्ज्वला नारायण कांबळी (४८) हे गंभीर जखमी झाले.
झाडे पडून कुडतरी, बाणावलीत नुकसान
मडगाव, नावेली यासह कुडतरी व बाणावलीत झाडे पडण्याच्या घटना घडल्या. कुडतरीत झाड पडल्याने २५ हजारांचे तर बाणावलीत दोन हजारांचे नुकसान झालेले आहे.
क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटिंग घेणाऱ्या चौघांना म्हापशात अटक
गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने एकता नगर - म्हापसा येथे छापा टाकून तिरंगी ‘ए’ मालिकेतील भारत-अ आणि श्रीलंका-अ यांच्यातील क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटिंग टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी मध्य प्रदेश येथील उमाशंकर जोशी (४२), अन्वेश सोनी (३०), फैजान शेख (२२) आणि हरियाणा येथील राहुल खोत (२५) या चार जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत २ लाख रुपये किमतीचे २ लॅपटॉप, ८ मोबाईल, एक राउटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स ऐवज जप्त करण्यात आले.
मंगळवार
राज्याला पावसाने झोडपले; अनेक ठिकाणी झाडे कोसळली
राज्याला पावसाने झोडपून काढले. २४ तासांत हंगामातील सर्वाधिक ३.४४ इंच पावसाची नोंद झाली. बहुतेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. यामुळे सत्तरी, बार्देश, फोंडा, डिचोली, तिसवाडी, काणकोणसह अन्य ठिकाणी पडझडीच्या घटनांची नोंद झाली.
बंद पडलेल्या ट्रकला दुचाकीची धडक; युवक ठार
चिखली येथे कोलवाळ औद्योगिक वसाहतीजवळ बंद पडलेल्या ट्रकला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात रविश यदुनंद तारी (२०, सांत इस्तेव, तिसवाडी) या युवकाचा मृत्यू झाला, तर लक्ष्मण भोसले (१८, हळदोणा) हा युवक गंभीर जखमी झाला.
गॅस बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने ३.२५ लाखांचा गंडा
महानगर गॅसचे बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने एका अज्ञात व्यक्तीने फातोर्डा येथील एका व्यक्तीची ३ लाख २५ हजार ४९० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
बिबट्याची स्कुटरला धडक बसून युवक गंभीर जखमी
गावकरवाडा-उसगाव येथे अचानक रस्त्यावर आलेल्या बिबट्याची धडक स्कुटरला बसून रविराज गावकर (शिरसोडे- सत्तरी) हा गंभीर जखमी, तर विघ्नेश गावकर (शिरसोडे- सत्तरी) हा किरकोळ जखमी झाला.
बुधवार
कोलवाळ येथे भंगारअड्ड्याला आग लागून ५० हजारांचे नुकसान
मुशीरवाडा, कोलवाळ येथील एका भंगारअड्ड्याला अचानक आग लागली. आगीत सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले असून भंगारअड्ड्याच्या मालकाने या दुर्घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त केला. भंगारअड्ड्यातील कामगारांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग लगेच भडकल्याने म्हापसा अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली.
नुवे सरपंचांना धक्काबुक्कीप्रकरणी फिडॉल परेरा यांची जामिनावर सुटका
नुवे येथील किरभाट भागात प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान गदारोळ झाला. या पाहणीदरम्यान नुवेच्या सरपंच फ्रेडा डिसा आणि सामाजिक कार्यकर्त्या फिडॉल परेरा यांच्यात शाब्दिक वादानंतर धक्काबुक्की झाली. यानंतर पोलिसांनी परेरा यांना प्रतिबंधात्मक अटक केली. नंतर जामिनावर त्यांची सुटका केली.
बागा येथे कर्नाटकातील युवक बुडाला
बागा- हडफडे समुद्रकिनाऱ्यावरील खडकांवर बसून वादळी समुद्राचा आनंद घेणारा अश्पाक मसाली (३२, विजयपूर, कर्नाटक) या पर्यटक युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. युवक आपल्या महाराष्ट्रातील मैत्रिणीसोबत गोव्यात पर्यटनासाठी आला असता ही दुर्दैवी दुर्घटना घडली.
गुरुवार
कोलवा येथे धावत्या गाडीवर माड कोसळला
कोलवा येथील मुख्य रस्त्यावर गुरुवारी वादळी वार्यासह आलेल्या पावसात माड उन्मळून चालत्या गाडीवर पडला. या घटनेत गाडीचे ४० हजारांचे नुकसान झाले असून कोणालाही दुखापत झालेली नाही. काही काळ वाहतुकीची कोंडी झाली.
वेळसांव पाळे येथे घरफोडी; साडेसात लाखांचा ऐवज लंपास
आपल्या घरातील ड्रेसिंग टेबलातील पाच लाखांची रोकड व सुमारे अडीच लाखांचे दागिने असा सुमारे साडेसात लाखांचा ऐवज अज्ञातांनी चोरल्याप्रकरणी वेळसाव पाले येथील ललिताबाई राठोड हिने वेर्णा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
शुक्रवार
बस्तोडा येथे आगीत खोली जळून खाक
बस्तोडा येथे लागलेल्या आगीत भाडेकरूची खोली जळून भस्मसात झाली. यामध्ये दागिने आणि घरगुती साहित्य जळाल्याने मोठे नुकसान असून म्हापसा अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी युवक दोषी
मुरगाव तालुक्यातील १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर केल्याप्रकरणी मूळ बिहार येथील २२ वर्षीय युवकाला मेरशी येथील पाॅक्सो न्यायालयाने दोषी ठरविले. दरम्यान, शिक्षेवर सोमवार २९ जून रोजी सुनावणी होणार आहे. याबाबतचा आदेश न्या. पूजा कवळेकर यांनी दिला.
अष्टगंधा अर्बन पतसंस्थेतील अफरातफर; आणखी दोन माजी संचालकांना अटक
बार्देश तालुक्यातील पिर्ण येथील अष्टगंधा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेत तब्बल ११ कोटी २८ लाख ९३ हजार २१३ रुपयांचा अफरातफर झाल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) माजी संचालक प्रकाश कांदोळकर यांच्यानंतर दिगंबर परब (डिचोली), मोहनदास देसाई (कुडचडे) या माजी संचालकांना अटक केली. दरम्यान परब आणि देसाई यांनी मेरशी येथील सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
शनिवार
म्हापसा येथे कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न
इंदिरानगर करासवाडा म्हापसा येथे एका भाड्याच्या खोलीत राहणार्या सोनुर्ली-सावंतवाडी येथील जाधव कुटुंबातील पिता व पुत्राचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. तर, महिला गंभीर जखमी असून तिच्यावर गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार सुरू आहे. जाधव कुटुंबाने अचानक उचललेल्या या टोकाच्या पाऊलाचे रहस्य उलगडण्याचे प्रयत्न म्हापसा पोलीस करत आहेत.
बोरी येथे कंटेनरची दुचाकीला धडक; चालकाचा जागीच मृत्यू
बोरी येथे शनिवारी झालेल्या भीषण अपघातात कंटेनर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. मात्र, पोलिसांनी कंटेनरचा शोध घेऊन वाहनासह चालकाला ताब्यात घेतले.
लक्षवेधी
म्हादई वन्यजीव अभयारण्याच्या मुख्य संरक्षित क्षेत्रातील जळवणी धबधबा परिसरात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी कर्नाटकातील खानापूर येथील ८ जणांवर गोवा वनविभागाने कारवाई केली आहे. वनविभागाच्या ‘पारवड अँटी-पोचिंग कॅम्प’च्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई करत संबंधितांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हे नोंद केले.
नेवरा येथे रेल्वे रुळावरून जात असताना समोरून येणार्या रेल्वेची धडक बसून २५ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला. जेम्स टोप्पो असे मृत तरुणाचे नाव असून, तो मूळचा झारखंड येथील रहिवासी होता. जेम्स हा गोव्यात कामानिमित्त आलेला होता व सध्या तो आगशी परिसरात कामाला होता.
हणजूण येथे हीट अॅण्ड रन अपघातात थार जीपच्या धडकेत दुचाकीस्वार आजोबा आणि शाळकरी नात जखमी झाली. या अपघातास कारणीभूत जीप गाडी तसेच चालक राकेश महंतो (रा. ओडिशा) याला हणजूण पोलिसांनी पकडले आहे.
वागातोर येथील एका रिसॉर्टमध्ये लल्लन यादव (४९, रा. उत्तरप्रदेश) हा सुरक्षा रक्षक मृत अवस्थेत आढळला. हणजूण पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून हे प्रकरण नोंद केले असून शवचिकित्सा अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण उघडकीस येणार आहे.