Home >> गोवा >> किल्ल्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन

किल्ल्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन

मुख्यमंत्री : हळर्ण किल्ल्याच्या संवर्धन कामाचे लोकार्पण


27th June, 11:47 pm
किल्ल्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन

हळर्ण किल्ल्याच्या पूर्वस्थितीत कामाचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत आमदार प्रवीण आर्लेकर, प्रसाद लोलयेकर, नीलेश फळदेसाई व इतर.
गोवन वार्ता प्रतिनिधी
पेडणे : गोव्यातील किल्ल्यांचे टप्प्याटप्प्याने जतन, संवर्धन केले जाईल. पर्यटन विकासाला प्राधान्य देऊन राज्यातील सर्व किल्ले समुद्रमार्गाने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. हळर्ण येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या पुनर्बांधणीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते.
व्यासपीठावर आमदार प्रवीण आर्लेकर, पुरातत्व खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर, संचालक नीलेश फळदेसाई, जिल्हा पंचायत सदस्य राघोबा कांबळी, जिल्हा पंचायत सदस्य श्रीकृष्ण हरमलकर, उपसरपंच दिया नाईक, इब्रामपूरचे सरपंच अशोक धावसकर, चांदेल हसापूरचे सरपंच बाळा शेटकर, तांबोसे उगवेचे सरपंच सुबोध महाले, वारखंड नागझरच्या सरपंच गौरी जोसलकर, धारगळचे सरपंच भूषण नाईक, पंच अॅड. मयूर परब आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, छ. शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे हे किल्ले राज्याचा अमूल्य वारसा आहेत. पर्यटकांना किल्ले कमी वेळात पाहता यावेत यासाठी समुद्रमार्गाने ते जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. खासगी भागीदारीनुसार ही योजना अंमलात आणण्याचा विचार आहे.
आमदार प्रवीण आर्लेकर यांनी हळर्ण किल्ल्याच्या पुनर्बांधणीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पुरातत्त्वमंत्री सुभाष फळदेसाई यांचे आभार मानले. हा किल्ला चांगला सुसज्ज व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करावे. किल्ल्याभोवती संरक्षक भिंत व उर्वरित भागाचेही संवर्धन करण्याची मागणी त्यांनी केली. पुरातत्त्व खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर म्हणाले, वारसा जतन करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थी व संशोधकांसाठी पुरातन वास्तू महत्त्वाच्या अभ्यासकेंद्र ठरतील. संचालक नीलेश फळदेसाई यांनीही विचार मांडले.
कार्यक्रमात कला आणि संस्कृती खात्यातर्फे जाहीर झालेल्या पुरस्कार राजमोहन शेट्ये, उमाकांत पोके, गोविंद नाईक यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात सूत्रसंचालन करून नीलेश नाईक यांनी आभार मानले.
किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध
राज्यातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध असून, हळर्ण किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ६६ लाख रुपये खर्च करून पुनर्बांधणी पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात संरक्षक भिंत, आतील कक्षांचे जतन व आधुनिकीकरण तसेच इतिहास संशोधक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे.            

हेही वाचा
सर्व पहा