विठ्ठलदासवाडा-मोरजी येथे उत्सव : गोव्यासह राज्याबाहेरील अनेक भाविकांची उपस्थिती

पेडणे : मोरजी येथील विठ्ठलदासवाडा परिसरातील माणार कपेल (सांताक्रूझ)चा वार्षिक फेस्त उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. उत्सवात हिंदू आणि ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येत धार्मिक सलोखा व सामाजिक ऐक्याचे अनोखे दर्शन घडविले.
मोरजी हे गाव धार्मिक सौहार्दाचे प्रतीक मानले जाते. गावात हिंदूंची मंदिरे तसेच ख्रिस्ती बांधवांची चर्च व कपेल विविध ठिकाणी असून, दोन्ही समाजातील नागरिक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. नाताळ, चतुर्थी तसेच इतर धार्मिक सण-उत्सवांमध्ये दोन्ही धर्मीयांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.
विठ्ठलदासवाडा येथील माणार कपेल हे ख्रिस्ती बांधवांचे प्रार्थनास्थळ असले तरी हिंदू बांधवही मोठ्या श्रद्धेने येथे येऊन आपल्या अडीअडचणी देवापुढे मांडतात. नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर फेडतात. या ठिकाणी आजही हिंदू परंपरेनुसार लामणदिवा प्रज्वलित केला जातो. कपेलच्या परिसरात असलेला क्रॉस आणि शेजारील तुळशी वृंदावन हे हिंदू-ख्रिस्ती ऐक्याचे प्रतीक मानले जाते.
वार्षिक फेस्ताच्या दिवशी ख्रिस्ती बांधवांकडून हिंदू बांधवांना विशेष मान दिला जातो. दोन्ही समाजातील भाविक आपल्या-आपल्या श्रद्धेनुसार प्रार्थना, नवस आणि गाऱ्हाणी मांडतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असून ती सामाजिक सलोख्याचा आदर्श ठरली आहे.
यंदाच्या फेस्तासाठी गोव्यासह राज्याबाहेरील अनेक भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या प्रारंभी चर्चच्या फादरनी विशेष प्रार्थना करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आमदार जीत आरोलकर यांची उपस्थिती
या धार्मिक सोहळ्यास मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनीही उपस्थित राहून प्रार्थना केली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. हिंदू-ख्रिस्ती ऐक्याचे दर्शन घडविणारा हा फेस्त मोरजीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचे वैशिष्ट्य असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.