Home >> गोवा >> म्हापसा येथे कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; की मृत्यूमागे वेगळे कारण?

म्हापसा येथे कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; की मृत्यूमागे वेगळे कारण?

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
27th June, 06:59 pm
म्हापसा येथे कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; की मृत्यूमागे वेगळे कारण?

म्हापसा : इंदिरानगर, करासवाडा-म्हापसा येथे एका भाड्याच्या खोलीत राहणार्‍या सोनुर्ली-सावंतवाडी (सिंधुदुर्ग)  येथील जाधव कुटुंबातील पिता व पूत्राचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. तर महिला गंभीर जखमी असून तिच्यावर गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रकार असल्याचे दिसून येत आहे. जाधव कुटुंबाने अचानक उचलेल्या या टोकाच्या पाऊलाचे रहस्य उलगडण्याचे प्रयत्न म्हापसा पोलीस करत आहेत.

मृतामध्ये अजय जाधव (३८) आणि अथर्व जाधव (७) यांचा समावेश आहे.  अजय यांची पत्नी सुवर्णा जाधव (३०) यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

गेल्या एका वर्षापासून जाधव कुटुंब इंदिरानगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. अजय जाधव हे पणजी येथील एका खासगी बँकेत नोकरीला होते.  सुवर्णा गृहिणी असून मुलगा अथर्व हा शाळेत जात होता. शनिवारी २७ रोजी दुपारी १२ वा. च्या सुमारास ही घटना उघडकीस आली.  अजय जाधव यांनी शुक्रवारी रात्री गावी आपल्या घरी वडिलांना फोन केला. मुलगा आणि बायको झोपत नाहीत, असे सांगितले. वडिलांनी त्यांना देवाचा अंगारा लाव आणि झोपा असा सल्ला दिला होता.  अजय यांनी भावाला फोन करून आपली तब्येत चांगली नसल्याचे सांगितले होते.

शनिवारी सकाळ पासून मुलगा व सून फोन उचलत नव्हते. संशय बळावल्याने अजयचे वडील थेट सोनुर्लीहून प्रवासी बसने म्हापशात आले व इंदिरानगर येथे मुलाच्या खोलीवर आले. मात्र खोलीचा दरवाजा आतून बंद होता. घर मालकाच्या सहाय्याने हा दरवाजा उघडला असता खोलीमध्ये मुलगा, सून व नातू निपचित पडले होते. हे थरारक दृश्य पाहून सर्वजण हादरले. तातडीने घटनास्थळी रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. परिचारिकेने सुवर्णा जाधव यांची नाडी तपासली तेव्हा ती जीवंत असल्याचे समजताच त्यांना तत्काळ म्हापसा जिल्हा इस्पितळात हलवण्यात आले. तिथून त्यांना पुढील उपचारार्थ गोमेकॉमध्ये पाठवण्यात आले. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर अजय व त्यांचा मुलगा अथर्व या दोघांचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलीस निरीक्षक नवीन देसाई, उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर व त्यांच्या सहाकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व  दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉत पाठवले.

मृत्यूचे कारण अस्पष्ट

घटनास्थळी खोलीमध्ये रात्री बनवलेले जेवण तसेच होते. त्यामुळे जाधव कुटूंबाने रात्री जेवणा अगोदर हा आत्महत्येचा धक्कादायक प्रयत्न केल्याचे प्राथमिक स्थितीत दिसून येत आहे.  हा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न आहे की,  यामागे अजून काही वेगळे कारण आहे? याचा तपास पोलीस करत असून जखमी सुवर्णा जाधव ही शुद्धीवर आल्यानंतरच या घटनेचे नेमके कारण समोर येणार आहे.