Home >> गोवा >> निवडणूक, पक्ष संघटनेचा बी. एल. संतोष यांच्याकडून आढावा

निवडणूक, पक्ष संघटनेचा बी. एल. संतोष यांच्याकडून आढावा

आमदारांनी घेतल्या भेटी : भाजप मुख्यालयाचे १५ ऑगस्टला उद्घाटन शक्य

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
28th June, 11:39 pm
निवडणूक, पक्ष संघटनेचा बी. एल. संतोष यांच्याकडून आढावा

पणजी : आम्ही पक्षाकडे कोणाविषयीही तक्रारी केलेल्या नाहीत. आगामी निवडणूक आणि पक्ष संघटनेच्या कामावरच आमची सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती भाजपचे मंत्री आणि आमदारांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतल्यानंतर दिली. दरम्यान, राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी मात्र या बैठकीतील चर्चेची अधिकृत माहिती देण्यास नकार दिला.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष हे आमदार आणि मंत्र्यांशी चर्चा करून पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी गोव्यात आले आहेत. शनिवारी संध्याकाळी गोव्यात आगमन झाल्यानंतर, त्यांनी रविवारी सकाळी कदंब पठारावरील भाजप मुख्यालयाच्या इमारतीच्या बांधकाम कार्याची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत पणजी कार्यालयात पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात ते सहभागी झाले. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी आमदार आणि मंत्र्यांशी ‘वन टू वन’ (वैयक्तिक) चर्चा केली. आरोग्यमंत्री विश्वजित राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, मंत्री रमेश तवडकर, आमदार प्रेमेंद्र शेट आणि आमदार नीलेश काब्राल यांनी बी. एल. संतोष यांची भेट घेऊन चर्चा केली.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की, माझ्या कोणाविषयीही कसल्याच तक्रारी नाहीत. आगामी निवडणुकीत पक्षाला बहुमताने विजयी करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. ही चर्चा केवळ संघटन अधिक मजबूत करण्याविषयी आणि निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने झाली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत म्हणाले की, बी. एल. संतोष यांच्यासोबत माझी ही केवळ सदिच्छा भेट होती. मी मंत्री झाल्यानंतर आमची ही पहिलीच भेट आहे. त्यांनी विशेषत्वाने पर्वरी उड्डाणपूल (फ्लायओव्हर) आणि दाबोळी येथील पुलाच्या संथ कामाविषयी विचारणा केली.
आमदार नीलेश काब्राल यांनी सांगितले की, कुडचडे मतदारसंघात माझे काम सातत्याने सुरूच आहे. मी पक्षाचा अनुभवी आमदार आहे. रोहन गावस देसाई किंवा इतर कोणालाही सामाजिक कार्य करण्याचा अधिकार आहे, त्याला माझी हरकत नाही. मात्र, निवडणुकीत उमेदवारी कोणाला द्यायची, याचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील.
भाजप मुख्यालयाच्या कामाची पाहणी
राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी कदंब पठारावर उभारण्यात येत असलेल्या भाजपच्या भव्य मुख्यालयाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. या पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले की, या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. या पाहणी दौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर उपस्थित होते.

हेही वाचा
सर्व पहा