Home >> गोवा >> गोवा-सिंधुदुर्ग रेती, चिरे, खडीच्या वाहतूक प्रश्नावर आठ दिवसांत तोडगा!

गोवा-सिंधुदुर्ग रेती, चिरे, खडीच्या वाहतूक प्रश्नावर आठ दिवसांत तोडगा!

आमदार नीलेश राणे यांचे आश्वासन : आमदार आर्लेकर यांच्या पुढाकाराने ट्रक व्यवसायिकांची बैठक

Story: गोवन वार्ता। विशेष प्रतिनिधी |
28th June, 11:18 pm
गोवा-सिंधुदुर्ग रेती, चिरे, खडीच्या वाहतूक प्रश्नावर आठ दिवसांत तोडगा!

पेडणे : गोव्यातील रेती, चिरे आणि खडी वाहतूक करणाऱ्या ट्रक व्यावसायिकांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर अखेर सकारात्मक पाऊल पडले आहे. सिंधुदुर्गमधील आमदार नीलेश राणे यांनी या प्रश्नावर आठ दिवसांच्या आत संबंधितांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या पुढाकाराने त्यांच्या धारगळ येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत हे आश्वासन देण्यात आले.

यावेळी गोवा राज्यातील ट्रक असोसिएशनतर्फे आमदार नीलेश राणे यांना निवेदन सादर करण्यात आले.

बैठकीत गोव्यातील ट्रक, रेती, चिरे आणि खडी व्यावसायिकांनी सिंधुदुर्गात माल आणताना आकारले जाणारे वाढीव दर, विविध शुल्क आणि त्यामुळे व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडेनासा झाल्याची व्यथा मांडली. अनेक ट्रक मालकांनी वाढत्या खर्चामुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याचे सांगत शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली.

आमदार नीलेश राणे म्हणाले की, गोवा आणि सिंधुदुर्गचे नाते अनेक वर्षांपासून अतूट आहे. हे मैत्रीचे आणि सहकार्याचे संबंध पुढेही अधिक दृढ राहिले पाहिजेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत, तसेच आमदार प्रवीण आर्लेकर हे आमचे मित्र आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यांतील व्यावसायिकांना न्याय मिळेल, असा समन्वय साधण्याचा आम्ही प्रयत्न करू.

ते पुढे म्हणाले की, रेती, चिरे आणि खडी व्यवसायासंदर्भातील सर्व प्रश्न संबंधित व्यावसायिक, संघटना आणि प्रशासनाशी चर्चा करून सोडविले जातील. आठ दिवसांच्या आत सिंधुदुर्गातील रेती व खाण व्यवसायिकांची स्वतंत्र बैठक घेऊन सर्व बाजू समजून घेत योग्य निर्णय घेतला जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही आणि दोन्ही राज्यांतील व्यावसायिकांचे हित जपणारा तोडगा काढला जाईल.

बैठकीत ट्रक व्यवसायिकांनी सांगितले की, सिंधुदुर्गात माल आणताना विविध प्रकारचे अतिरिक्त दर आकारले जात असल्याने गोव्यातील व्यावसायिकांना स्पर्धा करणे कठीण झाले आहे. स्थानिक व्यावसायिकांकडे स्वतःच्या खाणी, वाहने आणि इतर सुविधा असल्याने त्यांना कमी दरात व्यवसाय करणे शक्य होते; मात्र गोव्यातील ट्रक मालकांसाठी हा व्यवसाय दिवसेंदिवस तोट्याचा ठरत असून अनेकांनी व्यवसाय बंद केला आहे.

संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शेट्ये यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधत सांगितले की, हा केवळ व्यवसायाचा प्रश्न नसून शेकडो ट्रक मालक, चालक आणि त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. त्यामुळे या समस्येवर तातडीने न्याय्य तोडगा काढावा.

बैठकीत दोन्ही राज्यांतील व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्यावर, वाहतूक व्यवसायातील अडथळे दूर करण्यावर आणि ट्रक व्यावसायिकांच्या हिताचे निर्णय घेण्यावर एकमत झाले.

व्यावसायिकांचे हित जपणारा तोडगा निघेल!

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले की, या विषयावर यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीतही बैठक झाली होती. मात्र त्यानंतर काही कारणांमुळे प्रश्न कायम राहिला. ट्रक व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी आमदार नीलेश राणे यांच्याशी थेट संपर्क साधला आणि तत्काळ बैठक आयोजित करण्यात आली. व्यावसायिकांचे हित जपणारा तोडगा काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.