मडगावहून कारवारच्या दिशेने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनर्थ ओढवला

पणजी : गोव्यातील रस्ते अपघातांचे सत्र सुरूच आहे. आज रविवार २८ जून रोजी सकाळच्या सत्रात काणकोण परिसरातील तळपण येथे मनोहर पर्रीकर बायपास महामार्गावर एक भीषण कार अपघात झाला. मडगावहून कारवारच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. कारवरील ताबा सुटल्यानंतर गाडी रस्त्यावरून सुमारे १५ मीटर अंतरावर असलेल्या शेतात जाऊन कोसळली. ही दुर्घटना इतकी भीषण होती की, गाडीत प्रवास करणाऱ्या दोघांपैकी एक जण गाडीतच अडकून पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने, दुसऱ्या व्यक्तीने वेळेत गाडीबाहेर येत आपला जीव वाचवला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले असून, पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.
राज्यातील अपघातांची ही ताजी आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यंदा १ जानेवारी ते ३१ मे या अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत गोव्यात तब्बल १,०९४ रस्ते अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये ११२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्वात जास्त धक्कादायक बाब म्हणजे, या मृतांमध्ये सर्वाधिक ७३.२१ टक्के म्हणजेच ८२ जण हे दुचाकीचालक आणि त्यांच्या मागे बसलेले सहप्रवासी आहेत. रस्त्यांवरील हा थरार थांबवण्यासाठी वाहतूक पोलीस विभाग, स्थानिक पोलीस आणि वाहतूक खात्यातर्फे सातत्याने विविध उपक्रम आणि जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत. मात्र, तरीही वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे आणि वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढतच आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचे दिसते. २०२५ मधील पहिल्या पाच महिन्यांत गोव्यात १,०१७ अपघात झाले होते, तर २०२६ मध्ये याच कालावधीत हा आकडा १,०९४ वर पोहोचला आहे. याचाच अर्थ गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अपघातांमध्ये ७.५७ टक्क्यांची वाढ झाली असून ७७ अपघात अधिक झाले आहेत. दिलासादायक बाब एवढीच की गेल्या वर्षी पाच महिन्यांत ११८ मृत्यू झाले होते, तर यंदा ११२ मृत्यू झाले असून मृत्यूच्या प्रमाणात ५.०८ टक्क्यांची अल्प घट झाली आहे. तरीही, वाढती अपघातांची संख्या पाहता वाहन चालवताना स्वयंशिस्त आणि वेगावर नियंत्रण ठेवणे हाच एकमेव पर्याय आता गोवेकरांच्या हातात उरला आहे.