Home >> ताज्या बातम्या >> पहिलीच्या कोकणी पुस्तकातील व्याकरणाच्या चुका, एआय चित्रांचा वापर

पहिलीच्या कोकणी पुस्तकातील व्याकरणाच्या चुका, एआय चित्रांचा वापर

पाठ्यपुस्तकांत सुधारणा करण्याची मागणी


10 mins ago
पहिलीच्या कोकणी पुस्तकातील व्याकरणाच्या चुका, एआय चित्रांचा वापर

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : इयत्ता पहिलीच्या कोकणी पाठ्यपुस्तकातील धडे व कवितांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित चित्रांचा वापर करण्यात आला आहे. तसेच मजकूर आणि व्याकरणामध्येही काही चुका आहेत. त्यामुळे त्यात सुधारणा करण्याची मागणी कोकणी लेखक आणि अभ्यासकांनी केली आहे. अखिल भारतीय कोकणी परिषदेचे कार्याध्यक्ष चेतन आचार्य आणि इतर प्रतिनिधींनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी)च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली.
पाठ्यपुस्तकांतील धडे आणि कवितांच्या शेजारी असलेली चित्रे त्या धड्यांशी किंवा कवितांतील आशयाशी सुसंगत असणे आवश्यक असते. मात्र पहिलीच्या कोकणी पुस्तकातील काही धडे आणि कवितांजवळील चित्रांचा मजकुराशी संबंध दिसून येत नाही. पुस्तक तयार करताना एआय-आधारित चित्रांचा वापर केल्यामुळे हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात आले.
पुस्तकातील धडे, कविता किंवा मजकूर चित्रकारांकडे दिला जातो. चित्रकार तो वाचून त्यानुसार चित्रे तयार करतात. पहिलीच्या पुस्तकात मजकुराइतकेच चित्रांनाही महत्त्व असते. लहान मुलांना धडा किंवा कवितेचा अर्थ समजण्यासाठी चित्रे अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यामुळे एआय-आधारित चित्रांचा वापर न करता चित्रकारांकडूनच चित्रे तयार करून घ्यावीत, अशी सूचना अभ्यासकांकडून करण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी)नुसार एससीईआरटीला पाठ्यपुस्तके तयार करावी लागतात. ती वेळेत तयार करण्याचेही मोठे दडपण असते. तरीसुद्धा पहिलीच्या कोकणी पुस्तकात आवश्यक ते बदल आणि सुधारणा व्हाव्यात, यासाठी आम्ही एससीईआरटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे, असे चेतन आचार्य यांनी सांगितले.


आवश्यक सुधारणा सुचविणार
व्याकरण आणि शब्दरचनेतील चुका दुरुस्त करण्याची सूचनाही आम्ही केली आहे. ज्या चुका तातडीने सुधारता येतील, त्या यावर्षीच दुरुस्त कराव्यात. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने पुस्तके वेळेत उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या पुस्तकांमध्ये मोठे बदल करणे शक्य होणार नाही. दरवर्षी सुधारणा होत राहायला हव्यात. यंदा आढळलेल्या चुका पुढील वर्षी कायम राहू नयेत. त्यामुळे पुस्तकाचा सखोल अभ्यास करून आणखी आवश्यक सुधारणा सुचविणार आहोत, असे अखिल भारतीय कोकणी परिषदेचे कार्याध्यक्ष चेतन आचार्य यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा