‘एआय’ कॅमेऱ्यांद्वारे होणार कारवाई : २६ प्रमुख ठिकाणी ‘आयटीएमएस’ होणार कार्यान्वित

पणजी : गोव्यात १ जुलै रोजीपासून ‘इंटेलिजेन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ (आयटीएमएस) अर्थात अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. यात राज्यातील २६ प्रमुख ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक नियम उल्लंघनावर कारवाई करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक नियम उल्लंघन संदर्भात मागील पाच महिन्यांत केलेल्या कारवाईची दखल घेतली असता, ८७,५६३ जणांकडून ३ कोटी ७८ लाख ९२ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
राज्यात खालील २६ ठिकाणी एआय कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येणार. आयटीएमएस यंत्रणा पणजीत मेरशी जंक्शन, वेर्णा येथील बिर्ला क्रॉस, नावेली, मडगाव येथील जुने मार्केट जंक्शन, फातोर्डा, आर्लेम जंक्शन, घोगळ बोळशें जंक्शन, पॉवर हाऊस जंक्शन, मुंज विहार जंक्शन, नुवे येथील टाटा शोरुम जंक्शन, गोवा सिरॅमिक्स जंक्शन, गोरवटी, नुवे बायपास, वेर्णा येथील मिसिंग लोटली मिसिंग लिंक, टायटन जंक्शन, आयएफबी, रवी कॅफे, चिखली पंचायत, बेताळभाटी, कोलवा येथील ग्रीन हाऊस, बाणावली येथील मारिया हॉल, कुडचडे येथील आंबेडकर जंक्शन, म्हापसा येथील तार-बस्तोडा, आकय आणि धुळेर या जंक्शनवर कार्यरत करण्यात येणार आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन; गत पाच महिन्यांतील कारवाई
- गाडी चालवताना मोबाईलचा वापर केल्यामुळे १,४५३ जणांवर कारवाई करून ८,३२,००० रुपये दंड वसूल केला आहे.
- रुग्णवाहिका किंवा अग्निशामक दलाच्या वाहनांना जाण्यास अडथळा आणल्याप्रकरणी तसेच वाहतूक सिग्नलचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. मात्र, वरील यंत्रणेमुळे भविष्यात कारवाई होणार आहे.
- सीट बेल्ट न घातल्यामुळे १,२२२ वाहन चालकांवर कारवाई करून ८ लाख ३४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला.
- विनाहेल्मेट दुचाकी चालविल्यामुळे ३९,८०० जणांकडून १ कोटी ८१ लाख ५०० रुपये दंड वसूल केले आहे.
- अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे १७,२६२ जणांकडून ७१ लाख ११ हजार रुपये दंड वसूल केले.
- नो पार्किंगमुळे ३,९७९ जणांकडून १० लाख ७३ हजार ५०० रुपये दंड वसूल केला.
- अनधिकृत ठिकाणी वाहन उभे केल्यामुळे ८,७२३ जणांकडून २६ लाख ९८,५०० रुपये दंड वसूल केला.
- दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास केल्यामुळे १,५५४ जणांकडून ७ लाख ९० हजार ५०० रुपये दंड वसूल केला.
- धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करणे : पहिल्या वेळेस ५०० रुपये, तर दुसऱ्या वेळेस १,५०० रुपये दंड.
- इतर नियमित वाहतूक उल्लंघन मिळून मागील पाच महिन्यांत ८७,५६३ जणांकडून ३ कोटी ७८ लाख ९२ हजार रुपये दंड वसूल केला आहे.