विधानसभेचा आखाडा : सावर्डे

स्थापनेपासून मतदारसंघावर मगो, भाजपचे प्राबल्य
दीपक पावसकरांना गोवा फाॅरवर्डची साथ शक्य
विनय तेंडुलकरांचा पाठिंबा कोणाला याबाबत औत्सुक्य
..
गोवन वार्ता
प्रतिनिधी
सावर्डे : अवघ्या आठ विधानसभा निवडणुकांचा अनुभव असलेल्या सावर्डे मतदारसंघाची रचना १९८९ साली झाली. त्यापूर्वी या भागाचा समावेश सांगे मतदारसंघात होता. २०१० नंतर अस्तित्वात आलेल्या धारबांदोडा तालुक्यातील पाच पंचायती व सांगे तालुक्यातील दोन पंचायती मिळून सावर्डे मतदारसंघ कायम आहे. विद्यमान आमदार तथा सभापती डॉ. गणेश गावकर व समाज कार्यकर्ते तथा मुख्यमंत्र्यांचे स्वीय साहाय्यक संकेत आर्सेकर हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. माजी आमदार तथा माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, विनायक गावस हेही भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
सांगे मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. असे असूनही सावर्डे मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत या मतदारसंघात काँग्रेसला पाय रोवता आलेला नाही. हा मतदारसंघ भाजप व मगोचा बालेकिल्ला मानला जात आहे. १९८९ च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाचे मोहन आमशेकर विजयी झाले होते. १९९४ च्या निवडणुकीत मगो पक्षाचे विष्णू प्रभू यांनी विजय संपादन केला. १९९९ व २००२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विनय तेंडुलकर विजयी झाले. २००७ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उद्योगपती अनिल साळगावकर यांनी विजय मिळवला. २०१२ च्या निवडणुकीत बलाढ्य उमेदवार अर्जुन साळगावकर यांचा पराभव करून भाजपचे गणेश गावकर विजयी झाले. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाचे दीपक पावसकर यांनी भाजपचे उमेदवार गणेश गावकर यांचा ५,२२१ मतांच्या फरकाने पराभव केला, मात्र २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे गणेश गावकर यांनी पुरागमन करून अपक्ष उमेदवार दीपक पावसकर यांचा ५,१९० मतांनी पराभव केला.
सध्या आमदार डॉ. गणेश गावकर हे सभापती आहेत. या मतदारसंघातील गणेश गावकर व विनय तेंडुलकर हे प्रदीर्घ काळ राजकारणात टिकलेले व कसलेले राजकारणी आहेत. या मतदारसंघात भाजप व मगो सोडल्यास इतर पक्षांचे प्राबल्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र २०२७ च्या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप असे चित्र सध्याच्या घडीला दिसून येत आहे.
विनायक गावस यांना भाजप उमेदवारीची अपेक्षा
भाजपच्या तिकिटासाठी सभापती डॉ. गणेश गावकर, विनय तेंडुलकर, विनायक गावस व संकेत आर्सेकर हे इच्छुक आहेत. पैकी मागच्या निवडणुकीत मगो पक्षातर्फे निवडणूक लढवलेले विनायक गावस यांनी हल्लीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे; पण तरीही कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढविणारच, असे ते बोलून दाखवत आहेत. गेल्या ४० वर्षांपासून धारबांदोडा पंचायत त्यांच्या हातात आहे. सध्या मतदारांच्या संपर्कात ते आहेत. त्यामुळे भाजपचे तिकीट न मिळाल्यास ते भाजपमध्ये राहतात की इतर पक्षाची वाट धरतात किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
विनय तेंडुलकर ठरणार ‘किंग मेकर’
विनय तेंडुलकर हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. पक्षात राहून त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत. आपण यंदा निवडणूक लढविणार आहोत, असे ते सांगत आहेत. त्यांनी त्यादृष्टीने कामही सुरू केले आहे. मात्र गणेश गावकर यांना तिकीट मिळाल्यास आपण त्यांना पाठिंबा देऊ, असे उघडपणे जाहीर करून त्यांनी अनेक संकेत दिले आहेत. एक मात्र खरे विनय तेंडुलकरांच्या पाठिंब्याशिवाय सावर्डे मतदारसंघातील कोणताच उमेदवार विजयी होऊ शकत नाही. दखल घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी आपले पुत्र विनील तेंडुलकर यांना आतापासूनच मतदारसंघात सक्रिय करून आपली पुढील रणनीती स्पष्ट केली आहे.
संकेत आर्सेकरांच्या चालीकडे लक्ष
संकेत आर्सेकर यांनी मतदारसंघात आपले काम जोरदारपणे सुरू केले आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेले व अनेक वर्षांपासून सावर्डेच्या राजकारणात सक्रिय आणि गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले राजकारणी त्यांना मनापासून साथ देतील का, यावर संकेत आर्सेकर यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. संवैधानिक उच्च पदावर असलेले सभापती डॉ. गणेश गावकर व भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य विनय तेंडुलकर यांच्यासारखे दिग्गज असताना संकेत आर्सेकर यांनी मतदारसंघात केलेल्या प्रवेशाने मतदारसंघातील अनेकांना हादरून सोडले आहे, हेही तितकेच खरे आहे.
मतदारांची नाडी ओळखलेला नेता : गणेश गावकर
डॉ. गणेश गावकर हे सावर्डे मतदारसंघाच्या विकासाचे खरे शिल्पकार आहेत, असे अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे. अत्यंत धूर्त व अभ्यासू राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. विकासाच्या बाबतीत कोणीही त्यांचा हात धरू शकत नाही, ही त्यांची जमेची बाजू आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना निवडून आणून त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. साकोर्डा पंचायतीच्या पोटनिवडणुकीत आपण पुरस्कृत केलेला उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यात ते यशस्वी ठरले आहेत. फोंड्यात राहूनही ते जास्तीत जास्त काळ मतदारसंघात उपलब्ध राहतात. सतत मतदारसंघात फेरफटका मारताना ते दिसतात. मध्यंतरी आरोग्याची तक्रार असूनही ज्या प्रमाणे त्यांनी मतदारांना वेळ दिला, ते पहाता त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल अंदाज येतो. भाजप उमेदवारीचे ते प्रमुख दावेदार आहेत. त्यांना नाकारून त्यांच्या मनाविरुद्ध तिकीट दिल्यास ते आपला राजकीय रंग दाखवून देऊ शकतात इतकी क्षमता असलेले ते राजकारणी आहेत. त्यामुळे भाजपची उमेदवारी कुणाला मिळते यावर सर्व काही अवलंबून आहे.
अन्य पक्षांचा अस्तित्वासाठी झगडा
माजी बांधकाम मंत्री दीपक पावसकर निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. ते गोवा फॉरवर्डच्या संपर्कात आहेत. गोवा फॉरवर्डचे तिकीट त्यांना मिळते की भलत्याच व्यक्तीला, हे पहावे लागेल. मतदारसंघातील उभरते युवा नेतृत्व व रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे मागील विधानसभा उमेदवार विपीन नाईक यांनी पक्षातील अंतर्गत संघर्षामुळे राजीनामा दिला आहे. त्यामुळे या पक्षाचा उमेदवार रिंगणात असेल की नाही याचा अंदाज बांधणे कठीण आहे. आम आदमी पक्षाचा उमेदवार असला तरी फारसा फरक पडणार नाही. एकंदरीत भाजप व मगो पक्षाची युती झाल्यास यातील एका पक्षाचा उमेदवार रिंगणात असणार नाही. याचबरोबर काँग्रेस व गोवा फॉरवर्ड पक्षाची युती झाल्यास एक उमेदवार रिंगणात असणार आहे.
सावर्डे मतदारसंघातील आमदार
१९८९ मोहन आमशेकर
१९९४ विष्णू प्रभू
१९९९ विनय तेंडुलकर
२००२ विनय तेंडुलकर
२००७ अनिल साळगावकर
२०१२ गणेश गावकर
२०१७ दीपक पावसकर
२०२२ गणेश गावकर
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी मिळवलेली मते