अभ्यास मंडळावरील सदस्यांनी ज्यांना मारून-मुटकून साहित्यिक करून विद्यार्थ्यांच्या माथी मारले आहे आणि 'एससीईआरटी'ला काळोखात ठेवून आपला हेतू साध्य केला आहे. या संपूर्ण प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे; आणि अशा खुज्या व मनात कोतेपणा दाखवणाऱ्या लोकांना यापुढील काळात अशा जबाबदारीच्या कामांवर नियुक्त करण्यापूर्वी विचार केला पाहिजे.

'गोवन वार्ता'ने तटस्थ राहून प्रसिद्ध केलेल्या एका बातमीमुळे गोवा राज्य शैक्षणिक संशोधन मंडळाच्या मराठी पुस्तकांच्या अभ्यास मंडळाचे पितळ उघडे पडल्यानंतर गेले काही दिवस मंडळाच्या सदस्यांकडून सारवासारव सुरू आहे. चौथी ते नववी अशा सहा इयत्तांच्या पुस्तकांत गोव्यातील लेखकांवर अन्याय करून महाराष्ट्रातील लेखकांना प्राधान्य दिल्याचे त्या बातमीत म्हटले होते. विशेष म्हणजे, त्या बातमीत संत साहित्य आणि दिग्गजांचे साहित्य वगळले तरीही गोव्यातील लेखकांना जाणीवपूर्वक वगळल्याचे दिसते असे म्हटले होते. ती बातमीच गोव्यातील मराठी लेखकांच्या हितासाठी होती. त्यात कुठेच द्वेष नाही. पण काही कंपूतील लोकांनी या बातमीचा मराठी द्वेष असा सोयीस्कर अर्थ काढून काही दिवस सोशल मीडियावर गरळ ओकायला सुरुवात केली. त्यात ते स्वतःच उघडे पडले, कारण लोकांना त्यांची वैचारिक पातळी आणि साहित्य क्षेत्रातले योगदान कळून आले. अभ्यास मंडळाने काही निवडकांच्या हाती धार बोथट झालेल्या आणि गंजलेल्या तलवारी देऊन सोशल मीडियावर पाठवले. जे बातमीत नाही त्यावर मोठमोठे रकाने लिहिले गेले. त्यामुळे मूळ सोडून भलत्याच विषयांचा रवंथ सुरू आहे. या कंपूने मूळ बातमीनंतर ‘संगोसंगी वडाला वांगी’ या म्हणीसारखेच केले. अभ्यास मंडळाच्या लोकांनी गोव्याची अस्मिता जपली, भावविश्व वगैरे जपले असे ते सांगत आहेत पण जिथे गोव्यातील लेखकांनाच संधी नाही तर ही अस्मिता, प्रादेशिकता आणि भावविश्व महाराष्ट्रातील लेखकांनी जपले का, असा प्रश्न उपस्थित होतो. पण त्याचे उत्तर ते देऊ शकत नाहीत. आपापल्या नातेवाईकांना, मित्रांना अभ्यास मंडळाचा भाग करून संपूर्ण अभ्यासक्रमाला ‘फॅमिली ट्री’ करून टाकणाऱ्या अभ्यास मंडळाला मुळात गोव्याची अस्मिता आणि गोव्याची प्रादेशिकता यावर बोलण्याचा नैतिक अधिकार राहत नाही, हे त्यांनीही लक्षात घ्यावे. उगाच आव आणून आणि हातवारे करून रेटून खोटे बोलत असलात तरीही गोव्यातील लेखकांना तुम्ही तोंड दाखवू शकत नाही, अशी तुमची स्थिती झाली आहे. अशा ढोंगी लोकांचे बुरखेच या बातमीनंतर फाडले गेले.
'गोवन वार्ता'ने साधी बातमी प्रसिद्ध करून गोव्यातील लेखकांची तळी उचलून धरली त्यावर एवढा पोटशूळ उठला याचाच अर्थ ही साधी बातमीही वर्मावर लागली. या पुस्तकावर ‘सुना, नणंदा, काका, मावसे, मावश्या यांना हा अभ्यासक्रम समर्पित’ एवढे लिहायचे बाकी राहिले. ही नाती-गोती घुसवताना अभ्यास मंडळातील काही सदस्यांच्या लक्षात या गोष्टी आल्या होत्या, पण सर्वांनीच त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. त्यामुळे सारेच या गोष्टीला जबाबदार आहेत. गोव्यातील इतर लेखकांचे साहित्य मागवून आपल्याला हवे त्यांना संधी दिली आणि त्यांचे साहित्य कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यात आले. ज्यांचे साहित्य निवडले, त्यातील हयात असलेले अनेकजण हे अभ्यास मंडळावरील लोकांच्या मर्जीतलेच आहेत. मात्र आता कुसुमाग्रज, वसंत बापट, विष्णू वाघ यांची नावे पुढे करून त्यांच्या नावाला आक्षेप घेतल्याचे दाखवण्याचा प्रयत्न अभ्यासक्रमात संधी मिळालेले काही लोक करत आहेत. बातमीत दिग्गजांविषयी स्पष्ट उल्लेख असतानाही आपल्या बचावासाठी सोयीप्रमाणे वेगवेगळे तर्क काढून आपली बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासाठी काहींचा आटापिटा आहे.
गोव्यात दरवर्षी दीडशे ते दोनशे पुस्तके प्रकाशित होतात. डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी मुक्तिपूर्व आणि मुक्तिनंतरच्या काळातील गोमंतकीय मराठी कथा यासह मुक्तिनंतरच्या काळातील गोमंतकीय मराठी साहित्याविषयी प्रचंड लेखन केले आहे. गोव्यातील साहित्य, लेखन परंपरेविषयी हल्लीच साप्ताहिक 'साधना'मध्ये प्रकाशित झालेल्या विद्या प्रभुदेसाई यांच्या 'गोमंतकीयांचे मराठी साहित्यातील योगदान' या लेखात गोव्यातील मराठी वाड्मयनिर्मितीची परंपरा सांगितली आहे. त्यांच्या यापूर्वीच्या अनेक लेखांत गोमंतकीय कादंबरी, लेखक यांचा आढावा त्यांनी घेतलेला आहे. डॉ. सचिन कांदोळकर, सु. म. तडकोडकर, नारायण महाले, पौर्णिमा केरकर, खुद्द अनिल सामंत यांच्या अनेक लेखांतून, भाषणांतून गोव्यातील मराठी लेखन परंपरेविषयी नवी नवी माहिती समोर येत असते. अनेक लेखकांनी गोव्यातील लेखक, लेखन परंपरा, साहित्य प्रकार याविषयी वेळोवेळी जे लिहून ठेवले आहे त्यातून गोव्यातील लेखकांची ताकद सिद्ध होते. गोव्यात दोन मराठी अकादमी कार्यरत आहेत. गोव्यात तुम्हाला मराठी लेखकच सापडत नाहीत, इथले लेखक दर्जेदार लिहू शकत नाहीत, असे म्हणता तर या दोन्ही मराठी अकादमींची गोव्यात खरोखरच गरज आहे का? मराठी लेखकांना प्रोत्साहन द्यायचे सोडून त्यांना लिहिताच येत नाही, अशी जी भूमिका घेतली जात आहे तो खरा म्हणजे गोव्यातील लेखकांचा अवमान आहे. अभ्यास मंडळावरील सदस्यांनी काहींना मारून-मुटकून साहित्यिक करून विद्यार्थ्यांच्या माथी मारले आहे आणि 'एससीईआरटी'ला काळोखात ठेवून आपला हेतू साध्य केला आहे. या संपूर्ण प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे; आणि अशा खुज्या व मनात कोतेपणा दाखवणाऱ्या लोकांना यापुढील काळात अशा जबाबदारीच्या कामांवर नियुक्त करण्यापूर्वी विचार केला पाहिजे.