सरकारशी लागेबांधे आणि सत्ताधाऱ्यांकडे साटेलोटे असल्यामुळे अनेकजण आपल्याला जे हवे तेच करत आहेत. पण आपल्याला जे हवे ते आपण विद्यार्थ्यांवर लादत आहोत, याचा जर विसर पडला असेल, तर हे फार गंभीर आहेच, पण दुर्दैवीही आहे.

गोव्यात पाचवी ते नववीपर्यंतच्या इयत्तांसाठी नवा अभ्यासक्रम लागू झाला, ज्यात मराठी विषयाच्या पुस्तकांत गोव्याबाहेरील विशेषतः महाराष्ट्रातील लेखकांना सर्वात जास्त स्थान दिल्यामुळे 'एससीईआरटी'चे अभ्यास मंडळ वादात सापडले आहे. 'गोवन वार्ता'ने याविषयी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर अभ्यास मंडळाच्या मंडळींनी आपली बाजू वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. काहींनी गोव्यात चांगले लेखन करणारे लेखकच नाहीत असा सूर लावला, पण तशी अधिकृत प्रतिक्रिया देण्याचे मात्र टाळले. काहींनी बातमीच द्वेषपूर्ण असल्याचे म्हटले, तर काहींनी गोव्यातील लेखकांना स्थान देण्याचा पूर्ण प्रयत्न झाला असा खुलासा केला. काहींना गोव्यातील लेखक ३० टक्के आहेत असे वाटते, काहींना ४० टक्के; तर काहींनी गोव्यातील ५० टक्के लेखकांना स्थान दिल्याचा दावा केला आहे. पाचवी ते नववीच्या मराठी पुस्तकांत बहुतांश लेखक महाराष्ट्रातील आहेत, या अनुषंगाने ‘गोव्याच्या एससीईआरटीच्या मराठी पुस्तकांत जय महाराष्ट्र’ अशा आशयाचे वृत्त 'गोवन वार्ता'ने प्रसिद्ध केले. प्राथमिक स्तरावरही तीच स्थिती आहे. 'एससीईआरटी'च्या अधिकाऱ्यांनी मोठ्या विश्वासाने अभ्यास मंडळावर ज्या लोकांची वर्णी लावली, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मंडळाची दिशाभूल केली. आपले मित्र, पूर्वीचे विद्यार्थी, नात्यातील लोकांना अभ्यासक्रमात कसे स्थान दिले आहे, हे मान्य करायला जे धाडस हवे ते अभ्यास मंडळातील लोक दाखवतील का, हाच खरा प्रश्न आहे. '
एससीईआरटी'चे प्रमुखपद नागरी सेवा अधिकाऱ्याकडे असते. काम चांगले कसे होईल, प्रशिक्षण, अभ्यास यासाठी काय सुविधा देता येतील त्या सगळ्या कामांत 'एससीईआरटी'ने कुठेही कसर ठेवली नाही. वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यास मंडळांची स्थापना केल्यामुळे फक्त एका मराठीच्याच अभ्यास मंडळातील लोकांचे लाड होतील, हे अपेक्षित नाही. पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी जास्त अवधी देण्याची गरज होती. दिग्गज आणि चांगले लेखक यांची सांगड घालण्यासाठी, त्यांना विषयानुसार स्वतंत्र लेखनाची संधी द्यायला हवी होती. ज्यातून निवड करून अभ्यासक्रम तयार करता आला असता; पण तसे काही झालेले नाही. दर्जेदार पुस्तक तयार करण्यापेक्षा आपल्याला कोण जवळचा आहे, त्यांना कसे प्राधान्य देता येईल त्याचाच विचार यावेळी जास्त झाला आहे.
नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे ज्या पद्धतीने शिक्षण हवे त्या पद्धतीचे लेखन करून घेणे, हेही अभ्यास मंडळाचे काम आहे. ८० च्या दशकात तयार केलेला अभ्यासक्रम हा आजही चर्चेत आहे आणि त्यावेळचे विद्यार्थी, शिक्षकांच्याही तो स्मरणात आहे. काहींना आता केले आहे तसे पुस्तक पूर्वी कधी झाले नव्हते, असे वाटते. त्या आत्मस्तुतीतून काहींना बाहेर येता येत नाही. असो. ८० च्या दशकात जयराम कामत, डॉ. सोमनाथ कोमरपंत, य. बा. सुतार, वैजयंती प्रभुगांवकर असे काही मान्यवर त्यावेळी मराठीच्या अभ्यासक्रमाच्या संपादकीय मंडळावर होते, ज्यांनी साहित्य निर्मितीवर भर दिला होता. प्रात्यक्षिके, शिकवणी, शिकवणीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, शिक्षकांची शिकवणी पद्धत, परिणामकारकता अशा गोष्टींचा अभ्यास करून नंतर तो निश्चित केला. तब्बल दोन वर्षे त्या अभ्यासक्रमासाठी लागली होती. आज काळ बदलला आहे. आज अभ्यासक्रमातील मराठीची जी पुस्तके तयार केली आहेत, त्यात भरमसाट लेखकांना घेतले आहे. काहींकडून साहित्य मागवले, तर काहींचे जुने साहित्य वापरले. आपल्याला जे लेखक चांगले दिसतात, त्यांच्या साहित्याची सरमिसळ करण्यात आली आहे. मुख्य प्रश्न असा आहे की, काळ बदलला असूनही आणि गोवा घटक राज्य होऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत असताना, पाठ्यपुस्तक निर्मितीत महाराष्ट्रातील लेखकांना इतके प्राधान्य का दिले गेले? स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर गोव्याची मराठीचे पुस्तक तयार करताना ही दशा का झाली? पण त्यावर न बोलता भलत्याच विषयांवर खुलासे केले जात आहेत. अभ्यास मंडळातील सदस्यांनी एकमेकांना खुश करण्याचे तत्त्व अवलंबले, हे ही पुस्तके पाहिल्यानंतर स्पष्ट दिसते. आपले विद्यार्थी, सहकारी, नातलग आणि मित्र-मैत्रिणींना या ना त्या मार्गाने घुसवण्याचा प्रयत्न झाला आहे; जो निंदनीय आहे. मुलांना चांगला अभ्यासक्रम देण्याच्या नावाखाली अभ्यास मंडळातील लोकांनी गोव्यातील लेखकांवर अन्याय केला आहे. गोव्यातील लेखकांकडूनही आता या गोष्टींचा निषेध होत आहे. सरकारशी लागेबांधे आणि सत्ताधाऱ्यांकडे साटेलोटे असल्यामुळे अनेकजण आपल्याला जे हवे तेच करत आहेत. पण आपल्याला जे हवे ते आपण विद्यार्थ्यांवर लादत आहोत, याचा जर विसर पडला असेल, तर हे फार गंभीर आहेच, पण दुर्दैवीही आहे.