
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू नदीच्या पाण्याबाबत कठोर भूमिका घेतल्याने भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. भारताने सिंधू जल संधी स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेला, मात्र तेथेही त्याला कोणताही ठोस निर्णय मिळू शकलेला नाही. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये अस्वस्थता वाढली असून दोन्ही देशांतील राजनैतिक वातावरण अधिक तणावपूर्ण झाले आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताविरुद्ध उघडपणे युद्धाची धमकी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर पाकिस्तानची जलसुरक्षा धोक्यात आली तर भारताविरुद्ध संघर्ष छेडला जाऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्यावरही युद्धाच्या तयारीचा आरोप केला जात आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात तणाव अधिक वाढल्याचे चित्र दिसत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहे. आठ ब्रिगेड्स आणि ३५ अँटी-ड्रोन युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत. तसेच एआय-आधारित फेन्सिंग, सर्व्हेलन्स आणि टार्गेटिंग प्रणालीही अधिक सक्षम करण्यात आली आहे. पाकिस्तानने इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि काउंटर-ड्रोन ग्रिड देखील विकसित केल्याचे समोर आले आहे. अफगाणिस्तान सीमेजवळील पाच बटालियन हलवून त्या रावलाकोट, कोटली आणि भींबर सेक्टरमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. हेच भाग भारतात घुसखोरीसाठी वापरले जात असल्याचेही सांगितले जाते.
भारताने १९६० ची सिंधू जल संधी स्थगित केल्यानंतर पाकिस्तानच्या जलसंकटात मोठी वाढ झाली आहे. भारताचे म्हणणे आहे की जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवाद थांबवत नाही, तोपर्यंत ही संधी पुन्हा लागू केली जाणार नाही. सिंधू नदी प्रणालीमध्ये एकूण सहा नद्या आहेत- सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. या नदीखोऱ्यात भारत, पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तानातील सुमारे ३० कोटी लोक वास्तव्यास आहेत.
१९४७ मध्ये भारत-पाक फाळणीनंतर पाण्याच्या वाटपावरून वाद सुरू झाला होता. १९५१ ते १९६० दरम्यान जागतिक बँकेच्या मध्यस्थीने चर्चा झाली आणि अखेर १९ सप्टेंबर १९६० रोजी कराची येथे भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांनी सिंधू जल संधीवर स्वाक्षऱ्या केल्या.
- सुदेश दळवी