Home >> विचार >> आपला गोवा... जिथे श्रद्धेला स्पष्टीकरणाची गरज नसते !

आपला गोवा... जिथे श्रद्धेला स्पष्टीकरणाची गरज नसते !

​पणजीच्या रंगीबेरंगी जुन्या घरांच्या गल्लीतून आम्ही चालायचो. तिथल्या भव्य चर्चसमोर वेगवेगळ्या धर्मांचे पालक आपल्या स्कूटर थांबवून नमस्कार करायचे. हा देखावा नव्हता, तो फक्त एक आपल्या संस्कृतीबद्दलचा आदर होता.

Story: ग्लोबल गोंयकर |
26th June, 10:26 pm
आपला गोवा... जिथे श्रद्धेला स्पष्टीकरणाची गरज नसते !

१९७० च्या दशकाच्या शेवटी आम्ही केनियाहून गोव्यात आलो. तेव्हा गोवा स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न करत नव्हता, तो जसा होता तसाच मनमोकळा जगत होता. मडगावच्या शाळेत एक वर्ष शिकल्यावर, वडिलांनी आम्हाला आमच्या गावच्या 'अवर लेडी ऑफ पर्पेच्युअल सकर' शाळेत टाकले. मागे वळून पाहताना वाटते की, तो निर्णय सर्वात उत्तम होता. शहरातले जीवन रोमांचक होते, पण गावाने आम्हाला आमच्या जगण्याची खरी लय परत मिळवून दिली. तिथे खऱ्या अर्थाने 'घरी आल्यासारखे' वाटले.

​​आम्ही गावातली सगळी मुले एकत्र असायचो. माझे जीवाभावाचे मित्र हिंदू होते. आमची श्रद्धा काय, हे कोणाला सांगण्याची गरजच पडली नाही. आम्ही एकत्र शाळेत जायचो, खाडीत पोहायचो आणि रोज संध्याकाळी क्रिकेट, फुटबॉल खेळायचो. संध्याकाळी चर्चच्या घंटा वाजायच्या, तेव्हा आम्ही खेळता खेळता आपोआप थांबायचो. आम्हाला कोणी तसे सांगितले नव्हते, किंवा 'का थांबायचे?' असा प्रश्नही पडत नव्हता. आपण वेगळे आहोत, तरीही एक आहोत हे आम्हाला सहज उमजले होते.

​आम्ही सगळे सण एकत्र साजरे करायचो. दिवाळी, ख्रिसमस आणि गणेशोत्सव! गणपती हा फक्त 'त्यांचा' सण नव्हता, तो 'आमचा' होता. गावच्या सार्वजनिक गणेशोत्सवात प्रत्येक मुलाला कला दाखवायची संधी मिळायची. आमचे शिक्षक वेगवेगळ्या राज्यांतून आले होते. ते आपापल्या भाषा, संस्कृती सोबत घेऊन आले, पण या कशानेही आमच्यात कधी भिंत उभी केली नाही.

​रात्री आम्ही आमचे गणिताचे सर 'चेरियन' यांच्या घरी अभ्यासाला जमायचो. तिथेच मुक्काम करून सकाळी 'रघूच्या टपरी'वर गरम पाव, बटाटा भाजी आणि जिलेबी खायला जायचो. रघूच्या टपरीची एक खोली गावचे ग्रंथालय म्हणून विश्वासावर चालायची. तिथून घेतलेली पुस्तके मुले प्रामाणिकपणे परत करायची.

​सरांचे घर म्हणजे केवळ वर्ग नव्हता. रेडिओवर बीबीसी चॅनेल लावून आम्ही तिथे नाचायचो. पुढे आम्ही मुलांनी मिळून ‘द टेम्पटेशन्स’ नावाचा बँड तयार केला. भात कापणीपूर्वी, त्याच खोलीत गणपती बाप्पाची मूर्ती बसवली जायची. आम्ही भजने गायचो, मांसाहार वर्ज्य करायचो. विसर्जन झाल्यावर सगळे एकत्र जेवायला बसायचो, ज्यामध्ये 'चिकन शाकुती' असायची. जगणे साधे होते, पण त्यात एकमेकांचा सहभाग होता.

​शाळेत कॅथलिक मुले धर्माच्या तासाला जायची, तर हिंदू मुले 'मॉरल सायन्स'च्या वर्गात जायची. ते जी मूल्ये शिकायचे, ती आमच्यापेक्षा वेगळी नव्हती. धर्म कधी कोणावर लादला गेला नाही, तो आदर ठेवून पाळला जायचा. माझे वर्गमित्र 'तो मी नव्हेच' आणि 'शेवटाचा प्याला' सारखी मराठी नाटके करायचे. एकच खंत होती की, वर्गात कोंकणी बोलण्याची परवानगी नव्हती. पण तरीही, 'आम्ही एकमेकांचे आहोत' हा धागा घट्ट होता. गावच्या सायबिणीच्या पालखीच्या वेळी हिंदू कुटुंबे रस्त्याच्या कडेला हातात हार घेऊन उभी असायची. यात कोणालाही काही चुकीचे वाटत नव्हते. हाच तर आपला गोवा होता.

​१९८० च्या दशकात मी 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी' (एनआयओ) मध्ये लागलो. सकाळी जुआरी नदी पार करून आगाशीवरून बस पकडण्यासाठी मी धावायचो. बसेस अगदी शांतपणे धावायच्या. प्रत्येक थांब्यावर कंडक्टरचा आवाज यायचा, "फुडे वच, फाटल्यान वच". बसमध्ये गर्दी असायची, पण हवेत साबणाचा सुगंध दरवळायचा.

​बांबोळी क्रॉसजवळ बस थोडी थांबायची. ड्रायव्हर-कंडक्टर, मग ते हिंदू, मुस्लिम असोत की ख्रिश्चन खाली उतरून क्रॉसला हार घालायचे. 'चार खांब' जवळ बस पुन्हा काही सेकंद थांबायची, जेणेकरून प्रवासी मळा मारुतीगडावरील मारुती मंदिराला डोके टेकवू शकतील. हे अगदी मनातून आणि सहज व्हायचे. आमचे देव एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत, हे आम्हाला ठाऊक होते.

​पणजीच्या रंगीबेरंगी जुन्या घरांच्या गल्लीतून आम्ही चालायचो. तिथल्या भव्य चर्चसमोर वेगवेगळ्या धर्मांचे पालक आपल्या स्कूटर थांबवून नमस्कार करायचे. हा देखावा नव्हता, तो फक्त एक आपल्या संस्कृतीबद्दलचा आदर होता.

'एनआयओ' मध्ये मला भारताची विविधता पाहायला मिळाली. आमचे संचालक डॉ. कासिम हे अत्यंत न्यायप्रिय नेते होते. आमच्यातले वेगळेपण हा कधीच धोका वाटला नाही. सहकाऱ्यांनी पुढे सांगितले की, आपल्या मुलांना गोव्यातल्या अशा मोकळ्या वातावरणात मोठे करणे, ही सर्वात मोठी भेट होती. आमचे नेते दयानंद बांदोडकर आणि जॅक सिक्वेरा यांच्यात विचारांची लढाई होती, धर्माची नाही. अलीकडच्या काळात, मनोहर पर्रीकर यांनीही गोव्याची शांतता बिघडवू पाहणाऱ्या शक्तींना कधीच थारा दिला नाही.

​एक नाजूक वळण

​पण आज तो सलोखा कुठेतरी धोक्यात आल्यासारखा वाटतोय. जी सहजता पूर्वी होती, त्याची जागा आता कडवटपणाने घेतली आहे. आता धार्मिक ओळख जास्त मोठ्याने ओरडून सांगितली जाते. मतभेद जास्त ठळक केले जात आहेत. जे आयुष्य आम्ही पूर्वी सहज जगत होतो, त्यासाठी आता स्पष्टीकरणे द्यावी लागत आहेत.

​ही गोष्ट काळजीची असली पाहिजे, कारण हा सलोखा मोठ्या घोषणांनी नाही, तर लहान-सहान गोष्टींमधून तयार झाला नव्हता. एकत्र बसने प्रवास करताना, सण साजरे करताना आणि एकत्र शांत बसण्यातून तो निर्माण झाला होता. घंटा वाजल्यावर किंवा मंदिर दिसल्यावर आपोआप हात जोडण्याच्या प्रवृत्तीमध्ये तो जिवंत होता.

​जर आपण ती सहजता गमावली, आणि गोव्याच्या संस्कृतीबद्दल काहीही माहिती नसलेल्या बाहेरच्या लोकांना जर आपण हा सलोखा नष्ट करू दिला... तर आपण केवळ जुन्या आठवणी गमावणार नाही, तर गोव्याचा मूळ आत्माच गमावून बसू.

ज्योकिम गोएस, (लेखक अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक असून मूळचे कुठ्ठाळी-गोवा येथील आहेत.)