भाजपचा 'विजयरथ' रोखण्यात विरोधकांना रस नाही, तर तत्काळ फायद्यासाठी एकमेकांची उणीदुणी काढण्यात विरोधक मग्न आहेत, असे दिसून येते. यातून विरोधकांच्या ऐक्याची ऐशीतैशी झाली आहे, हे सत्य पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसत आहे.

जसजशी गोवा विधानसभा निवडणूक समीप येऊ लागली आहे, तशी नवनवीन राजकीय समीकरणे तयार होऊ लागली आहेत. गेल्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत घडवून आणलेली जुनी समीकरणे मोडून नवी होऊ घातली आहेत. गेल्या १५ वर्षांत भाजपला हरवण्यासाठी आवश्यक असलेले ऐक्य घडवून आणण्यासाठी विरोधकांनी विशेष प्रयत्न करण्याची तसदी घेतली नसली, तरीही काही मोजके राजकारणी, माध्यमे आणि पत्रकारांना या तथाकथित ऐक्याविषयी उत्सुकता आहे. तशा अनेक 'फॅन्टसी' दर निवडणुकीवेळी चर्चेला येतात. गोव्यात 'काँग्रेस हा भाग्यवंत पक्ष आहे व भाजप हा कष्टाळू पक्ष आहे' हे गृहितक समोर ठेवून विचार केला असता असे दिसून येते की, काँग्रेसला आजतागायत अनेक संधी अगदी अलगदपणे आयत्या चालून आल्या होत्या; परंतु सरंजामी काँग्रेसी वृत्तीने या पक्षाचा घात केला व सत्तेचा घास त्यांच्या तोंडून हिरावून घेतला गेला. प्रस्थापितांविरोधी लाट असूनही, जनतेच्या मनात सत्ताधाऱ्यांविषयी प्रचंड प्रमाणात असंतोष असतानाही, या असंतोषाचे मतांत रूपांतर करण्यासाठी लागणारा नॅरेटिव्ह व राजकीय रणनीती आखण्यात विरोधक कमी पडले.
आज भाजपमध्ये सर्व काही आलबेल आहे असे समजण्याचे काही कारण नाही. भाजपमध्ये सर्व पक्षांतून सुखाने नांदायला आलेल्या उमेदवारांची भाऊगर्दी झालेली आहे, पण ही समस्या भाजप उत्तमरीत्या हाताळत आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. विरोधी पक्षांमध्ये ज्या समस्या आहेत, त्या नळावरची भांडणे होतात अगदी तशा स्वरुपात प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवर उघड केली जात आहेत. काँग्रेस आणि आरजी या पक्षांतील ताज्या राजकीय घडामोडींवर एक दृष्टिक्षेप टाकला असता असे दिसून येते की, येत्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी या पक्षांनी अजिबात केलेली नाही. अंतर्गत लाथाळ्या, पक्षांतर्गत गटबाजी व कुरघोड्या करण्यातच या पक्षांचे कार्यकर्ते, नेते व्यस्त असल्याचे दिसून येते. रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी आज गटबाजीमुळे कोलमडून पडला आहे, असे चित्र दिसून येते. आज या पक्षात मनोज परब गट आणि वीरेश बोरकर गट व या दोघांच्याही गटात नसलेला तिसरा गट असे एकूण तीन गट पडल्याचे स्पष्ट होते. ज्या सामाजिक समूहाला राजकीय आवाज नाही, ज्यांचे कुणीही कैवारी असल्याचा आभास निर्माण करत असले तरीही प्रत्यक्षात जमिनीवर तशी परिस्थिती नाही, त्यांच्या अवस्थेला सुधारू शकेल असा कुणीही वाली उरलेला नाही, असा वर्ग आरजीच्या मागे आला. माध्यमे, राजकारणी व प्रस्थापित राजकीय संघटनांनी २०२२च्या निवडणुकीचा निकाल येईपर्यंत त्यांना अजिबात गांभीर्याने घेतले नव्हते. ज्यावेळी अनपेक्षितपणे आरजीचा एक आमदार निवडून आला त्यावेळेपासून आरजीची चर्चा केली जाऊ लागली. आरजीचे २०२२च्या निवडणुकीतील राजकीय अस्तित्व हे थोडेफार भाजपच्याच पथ्यावर पडणारे ठरले. पण २०२७च्या निवडणुकीत आरजी हा पक्ष आपले अस्तित्व किमान टिकवून पुन्हा एकदा विधानसभेत पाऊल ठेवेल का, हा प्रश्नच आहे. गेल्या २५ वर्षांत प्रत्येक विधानसभा निवडणुकीत एक ट्रेंड कायम राहिलेला आहे. जसे पावसाळ्यात अळंबी उगवतात तसे काही पक्ष निवडणुकीपुरते उगवतात व नंतर गायब होतात. युगोडेपा, सेव्ह गोवा फ्रंट, गोवा विकास पार्टी ही काही त्यातलीच उदाहरणे आहेत. आरजीही त्यातीलच एक पक्ष ठरणार की काय, अशी भीतीही मूळ धरू लागली आहे. उपरोल्लेखित सर्व पक्षांचे अस्तित्व हे मतविभागणी करण्यापुरते मर्यादित होते, हे कोणीही सांगेल. गेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदारसंघनिहाय निरीक्षण केले असता, ज्या मतदारसंघात ख्रिश्चन मते २५ टक्क्यांच्या वर आहेत त्याठिकाणी १०-१५ टक्के मते फोडून आरजीने काँग्रेसला खिंडार पाडले असे दिसून येते आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार १०००-१२०० मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत.
काँग्रेसला राज्यात प्रदेशाध्यक्षांच्या रुपात गिरीश चोडणकर हे जुने शिलेदार 'नवे नेते' म्हणून दाखल झाल्यास जवळपास एक महिना होत आला. "घाऊक पक्षांतर व पक्षफुटी रोखण्यासाठी गोवेकरांनी काँग्रेसला २१ जागांवर विजयी करावे," हे चोडणकर यांचे वक्तव्य गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांना अस्वस्थ करून गेले. काँग्रेस आपल्या मित्रपक्षांना खिजगणतीत घेत नाही, ही सल त्यांनी जाहीरपणे काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखविली. जर का काँग्रेसला युती करायची नसेल व विरोधकांना एकाच व्यासपीठावर आणून, ऐक्य घडवून येणारी विधानसभा निवडणूक जिंकायची नसेल, तर आपण तरी का बरे दरवेळी पुढेपुढे करायचे हा साहजिक प्रश्न त्यांनी या मुलाखतीतून उपस्थित केला. विजय सरदेसाई यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा हेतू होता हेही स्पष्ट केले, पण काँग्रेसमधील एका गटाचा या विलिनीकरणाला विरोध होता, हेही त्यांनी स्पष्ट केले. विजय सरदेसाई यांचे राजकीय वलय पाहता प्रदेशाध्यक्षपद वा विरोधी पक्षनेते पद यापेक्षा काही कमी ते स्वीकारतील असे वाटत नाही. त्यांच्याकडे राज्यव्यापी मोहीम हाती घेऊन आपला प्रभाव निर्माण करण्याची जबरदस्त कुवत आहे, हे नाकारून चालणार नाही. अर्थात या कुवतीला काँग्रेसमधील काही नेते व एक विशिष्ट गट हुकूमशाही वृत्तीचा एक नमुना म्हणून पाहतो, अशीही चर्चा आहे. विजय सरदेसाईंना जर काँग्रेसमध्ये घ्यायचे होते, तर ते निवडणुकीला दीड वर्ष असताना घ्यायला हवे होते, तर आणि तरच ते काँग्रेसमध्ये प्राण फुंकू शकले असते. ना काँग्रेसला आपले पुनरुज्जीवन करायचे आहे ना विरोधकांना एक समान व समविचारी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात काही रस आहे.
निष्कर्षाप्रत येता एक गोष्ट प्रांजळपणे मान्य करावी लागेल ती म्हणजे, २०१२ साली भाजपने सासष्टी हा काँग्रेसचा गड उद्ध्वस्त केला. २०१७ साली देखील काँग्रेसला अपेक्षित असे यश सासष्टीत मिळवू दिले नाही. आणि २०२२ साली पण काँग्रेसला या तालुक्यात केवळ तीन जागांपुरते मर्यादित ठेवले. यावेळीही सासष्टी, मुरगाव, तिसवाडी आणि बार्देश या तालुक्यांतील मतदारसंघांत काँग्रेसला रोखण्यासाठी भाजपची विशेष रणनीती तयार होत आहे, असे दिसून येते. दर निवडणुकीत वेळ, पैसा व शक्ती या तिन्ही घटकांचा पुरेपूर वापर, पक्ष संघटनेला कामाला लावणे, नेत्यांच्या चिंतन बैठका, राज्यस्तरीय आढावा बैठका, गाभा समितीच्या बैठका, पक्षश्रेष्ठींना वेळोवेळी अहवाल, या सर्व गोष्टींतून भाजपची कष्टाळू वृत्ती दिसून येते, तर आयता जनाधार व सरकारविरोधात जनतेत राजकीय असंतोष पसरलेला असतानाही त्याचा फायदा घेऊन विरोधकांचे ऐक्य घडवून आणून या संधीचा लाभ घेण्याचे प्रयत्न काँग्रेस करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. विरोधक भाजपसाठी येती निवडणूक सुकर व आरामदायी करतील यात शंका नाही. भाजपचा 'विजयरथ' रोखण्यात विरोधकांना रस नाही, तर तत्काळ फायद्यासाठी एकमेकांची उणीदुणी काढण्यात विरोधक मग्न आहेत, असे दिसून येते. यातून विरोधकांच्या ऐक्याची ऐशीतैशी झाली आहे, हे सत्य पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसत आहे.
- प्रा. विघ्नेश शिरगुरकर, (लेखक कथालेखक, अनुवादक आणि कवी आहेत.)