Home >> विचार >> ते चार लोक

ते चार लोक

भाषा, अस्मिता, शिक्षण, संस्कृती या गोष्टींच्या प्रसारासाठी योग्य माणसे नियुक्त केली जावीत, जी समाजाशी जोडलेली असतील. आपल्या भोवतालचे हे चार लोक चांगले असतील, याची काळजी आता मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल.

Story: संपादकीय |
24th June, 11:31 pm
ते चार लोक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोलीत एका कार्यक्रमात बोलताना, 'आपण केलेल्या चांगल्या कार्याविषयी काही लोक मोकळेपणाने बोलत नाहीत. काही विशिष्ट लोकांनी केलेले कामच काही लोकांना आवडते. पण माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने केलेले काम गोव्यासाठी खूप महत्त्वाचे आहे,' असे म्हणत संस्कृती, भाषा, अस्मितेच्या संवर्धनासाठी आपण काय केले हे स्पष्टपणे सांगितले. ते कार्य का महत्त्वाचे आहे, हेही नमूद केले. काही संधीसाधूंना दूर ठेवून गेल्या सात वर्षांत मुख्यमंत्र्यांनी भाषा, संस्कृती आणि अस्मितेच्या दृष्टीने केलेले कार्य उल्लेखनीय आहे, यात दुमत नसावे. शणै गोंयबाब यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना काही वक्त्यांनी तर 'डॉ. सावंत हेच आम्हाला मुख्यमंत्री म्हणून हवेत,' असेही बोलून दाखवले. बहुजनांच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली काही कामे ही गेल्या ६० वर्षांत झाली नव्हती, हे मान्य करायला हवे. मोठमोठ्या नेत्यांना जे जमले नाही, ते कोणाचाही दबाव न घेता मुख्यमंत्र्यांनी करून दाखवले. पण त्यांच्या या कामांचा उल्लेख आणि प्रसार करायला त्यांचेच मंत्री, आमदार आणि त्यांनी वेगवेगळ्या संस्थांवर बसवलेले लोक कचरतात हेही विसरून चालणार नाही. अशा लोकांचा सरकारच्या कार्याला किंवा मुख्यमंत्री करत असलेल्या चांगल्या कामाच्या प्रसाराला काही फायदा आहे का, त्याचा विचार स्वतः मुख्यमंत्र्यांनी करायला हवा. 

कर्मचारी भरती आयोग स्थापन करण्याचा निर्णय हा गोव्यातील गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये संधी मिळवून देऊ शकतो, याची जाणीव अनेकांना नाही. आपलेच बगलबच्चे सरकारी नोकरीत भरती केले जावेत, असे काही नेत्यांना वाटते. काही नेते लोकांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून जिंकून येत असतात. अशा राजकीय नेत्यांच्या मक्तेदारीला सुरुंग लावण्याचे काम या आयोगामुळे शक्य होत आहे. 'प्रशासन तुमच्या दारी' या उपक्रमातून सरकारी खाती लोकांपर्यंत नेण्याची योजना असो किंवा गोव्यात स्वयंरोजगाराच्या वाटा अधिक सुकर करण्यासाठी राबवलेली 'स्वयंपूर्ण गोवा'सारखी योजना असो, हे सारे उपक्रम मुख्यमंत्र्यांनी सुरू केले. 'माझे घर'सारख्या योजनेमुळे आज हजारो गोमंतकीय आपल्या घराची जागा आपल्या नावावर होईल, या आशेने अर्ज भरत आहेत. 'अॅप्रेंटिसशिप'सारख्या योजनेमुळे गोव्यातील हजारो युवकांना वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये एक वर्ष कामाचा अनुभव घेता आला. शिक्षणाप्रमाणे त्यांना या काळात कामाचा मोबदलाही दिला गेला. हेही खरे आहे की, २०१९ नंतरच मोठ्या प्रमाणात वन हक्क दावे निकालात काढण्यात आले. मुंडकार प्रकरणे मोठ्या प्रमाणात हातावेगळी करण्यात आली. नव्याने सुरू होत असलेल्या जनकल्याण शिबिरांतून 'माझे घर'सारख्या योजनेचे अर्ज निकाली काढण्याचे काम होणार आहे. गोव्याची अस्मिता जपण्याचा भाग म्हणून कर्मचारी भरती आयोगाच्या परीक्षेत दहा गुणांचे प्रश्न कोकणीतून दिले जातात. या सगळ्या गोष्टी होत असल्या तरी सरकारचे घटक असलेले लोकच या चांगल्या उपक्रमांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांना आपल्या चांगल्या कामांविषयी काही लोक उघडपणे बोलत नाहीत, असे वाटत असावे. 

कोकणीच्या प्रसारासाठी मुख्यमंत्र्यांनी मुक्त हस्ताने मदत करणे सुरू केले आहे. कुठल्याही राज्याची अस्मिता जपण्यासाठी भाषा, संस्कृती जपणे आणि तिचे संवर्धन करणे फार महत्त्वाचे असते. हे करताना काही ठराविक लोकांच्या हाती आपण ही सर्व विकासाची केंद्रे देत आहोत का, याचाही विचार व्हायला हवा. सरकारच्या सर्व गोष्टींचा लाभ घेऊन, खुर्च्या मिरवून जेव्हा सरकारच्या चांगल्या गोष्टींविषयी बोलायचे असते तेव्हा सगळेजण नामानिराळे कसे राहतात, याचाही विचार कदाचित आता मुख्यमंत्री करत असतील. सर्वसामान्य लोकांनी त्यांच्याविषयी चांगले बोलण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा ते ज्या लोकांसोबत आहेत, ते लोक त्यांच्या कार्याविषयी का बोलत नाहीत, याचा विचार मुख्यमंत्र्यांना करावा लागेल. भाषा, अस्मिता, शिक्षण, संस्कृती या गोष्टींच्या प्रसारासाठी योग्य माणसे नियुक्त केली जावीत, जी समाजाशी जोडलेली असतील. आपल्या भोवतालचे हे चार लोक चांगले असतील, याची काळजी आता मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल. आपल्या आजूबाजूचे लोक चांगल्या कामांचा प्रसारच करत नाहीत, तर इतर लोक ज्यांच्याशी त्यांचे काही देणेघेणे नाही, ते त्यांच्याविषयी का म्हणून उघडपणे चांगले बोलतील? मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे गोव्याची संस्कृती टिकवण्याचे कार्य त्यांच्या कार्यकाळात झाले, तसे असेल तर या संस्कृती संवर्धनाच्या कार्यात जे लोक आहेत, त्यांनी सरकारच्या या कार्याचा प्रसार खरोखरच केला आहे का, ते तपासण्याची ही वेळ आहे.