आरोग्य, कल्याण आणि संतुलनासाठी हठयोग करणे ठीक आहे; पण तुम्हाला जर हठयोग त्याच्या संपूर्ण स्वरूपात करायचा असेल, तर त्यासाठी वेगळ्याच पातळीची शारीरिक क्षमता, सहभाग आणि शारीरिक उत्साह आवश्यक असतो.

सद्गुरू : हठयोगाचे अनेक पैलू आहेत. त्यातील एक मूलभूत पैलू म्हणजे, तुम्ही तुमच्या शरीराला मळत आहात. तुम्ही कधी भाकरी किंवा चपाती बनवली असेल, तर ती कशी तयार होते हे केवळ उष्णता किंवा तव्यावर अवलंबून नसते, तर पीठ किती चांगले मळले आहे, यावर देखील अवलंबून असते. केवळ हठयोग किंवा आसनेच तुम्हाला मळत नाहीत. जीवन देखील तुम्हाला असंख्य प्रकारे मळत असते. या मळण्यातून तुम्ही आनंदाने जाऊ शकता किंवा दुःखाने, पण ती तुम्हाला मळतेच. यातून तुम्ही परिपक्व होऊन उमलू शकता किंवा त्याद्वारे चिरडलेही जाऊ शकता. निवड तुमची आहे.
हठयोग केवळ तुमच्या स्नायूंनाच मळत नाही. तो ‘तुम्ही कोण आहात’ या प्रत्येक पैलूला मळतो, कारण तुम्ही ज्याला कर्म म्हणता, ते तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये आणि तुमच्या ऊर्जेच्या प्रत्येक पैलूमध्ये साठवलेले असते. प्रत्येकाची ऊर्जा वेगळ्या प्रकारची असते, ज्या प्रकारची स्मृती साठवलेली आहे त्यानुसार ती वेगळ्या प्रकारे कार्य करते. जसजसे तुम्ही हे मळता, तसतसे तुम्ही सर्व काही सैल करत जाता, सर्व काही अशा प्रकारे एकजीव करून टाकता की, त्याचे तुमच्यावर प्रभाव टाकण्याचे सामर्थ्यच उरत नाही. शरीराच्या माध्यमातून तुम्ही जीवन स्वतःच्या हाती घेता.
जीवनाला स्वतःच्या हाती घेण्याचे इतरही मार्ग आहेत, पण हठयोगाद्वारे तो कदाचित शारीरिकदृष्ट्या अधिक कष्टदायक वाटू शकतो, पण तो खात्रीशीर मार्ग आहे, कारण त्यामध्ये काय कार्य करते आणि काय कार्य करत नाही, हे तुम्हाला स्पष्टपणे समजते. जर तुम्ही मनाला मळून जीवन स्वतःच्या हाती घेण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही पुढे जात आहात की मागे, हेच तुम्हाला समजणार नाही. तुम्ही खरोखर अधिक लवचिक होत आहात की अधिक कठीण बनत आहात, हे देखील कळणार नाही. तुम्हाला वाटेल की, तुम्ही खूप चांगले करत आहात; पण तुमच्या आजूबाजूचे लोक कदाचित म्हणतील की, तुमच्यात काहीच सुधारणा झालेली नाही.
मन तुम्हाला सर्व प्रकारच्या खोट्या गोष्टी सांगत असते - रोज काहीतरी नवे खोटे. पण शरीर कधीच खोटे बोलत नाही. हीच त्याची सर्वात चांगली बाजू आहे. म्हणून जे लोक मनावर विश्वास ठेवत नाहीत, ते शरीरापासून सुरुवात करतात, कारण तो खात्रीशीर मार्ग आहे; जरी तो अधिक वेळ घेणारा आणि कष्टदायक असला तरी. खरे तर, तो कष्टदायक आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. जर तुम्ही महिन्यातील केवळ "शुभ" दिवशीच सराव करत असाल, तरच तो कठीण वाटेल. जर तुम्ही तुमचा सराव दररोज करत असाल, तर साधना कधीच समस्या ठरणार नाही. जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या चांगले असाल, तर हा सहज आणि सुंदर मार्ग ठरू शकतो.
"हठ" या शब्दाचा एक अर्थ - अर्थात याचे इतर शास्त्रीय अर्थ देखील आहेत - तो म्हणजे तुम्ही ठाम आहात. सकाळी पाच वाजता गजर वाजतो, तेव्हा शरीर तुम्हाला सांगते, "गप्प बस आणि झोप!" शरीराच्या स्वतःच्या काही आसक्ती असतात. पण तुम्ही ठाम असता. तुम्ही उठून हठयोग करता. हठयोगाचा हा एक पैलू आहे, कारण शरीराच्या आसक्तीच्या स्वरूपावर मात करण्यासाठी एका विशिष्ट ठामपणाची गरज असते. शरीराला कमी लेखू नका. त्याच्या मागे लाखो वर्षांच्या उत्क्रांतीचा इतिहास आहे. त्याच्या स्वतःच्या प्रवृत्ती आहेत, हेतू आहेत आणि आसक्ती आहे. ते इतक्या सहजासहजी मानणार नाही.
मानव असण्याचा सार म्हणजे आसक्तीकडून जागरूकतेकडे जाणे. एखादी व्यक्ती जर खूप आसक्तीने वागत असेल, तर तुम्ही म्हणता तो प्राण्यासारखा आहे, नाही का? तर, एका प्रकारे, तुम्ही आसक्तीच्या थोडेसे पलीकडे गेला आहात, म्हणून विचार करता की, तुम्ही मानव आहात. पण जेव्हा तुम्ही आसक्ती पूर्णपणे ओलांडून जाल, तेव्हाच तुम्ही पूर्ण अर्थाने मानव व्हाल. अन्यथा, तुम्ही मानव नसून मानव होण्याच्या प्रक्रियेत आहात.
तर हठयोग म्हणजे केवळ शरीराला वाकवणे आणि पिळणे नव्हे. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत विविध प्रकारे निर्माण झालेल्या सर्व आसक्तीच्या प्रवृत्ती जाणीवपूर्वक दूर करण्यासाठी केलेले कार्य म्हणजे हठयोग. हठयोग हा परम अवस्थेकडे पोहोचण्याचा एक मार्ग ठरू शकतो. त्यासाठी काही प्रमाणात वेळ आणि प्रयत्न आवश्यक असतात; पण केवळ शरीराचा वापर करून तुम्ही सर्व आसक्तीच्या प्रवृत्ती मोडून काढू शकलात, तर ती विलक्षण गोष्ट ठरेल. पण, जर तुम्ही जीवनाच्या सुरुवातीपासून हे केले, तर ते अधिक चांगल्या प्रकारे काम करेल. आरोग्य, कल्याण आणि संतुलनासाठी हठयोग करणे ठीक आहे; पण तुम्हाला जर हठयोग त्याच्या संपूर्ण स्वरूपात करायचा असेल, तर त्यासाठी वेगळ्याच पातळीची शारीरिक क्षमता, सहभाग आणि शारीरिक उत्साह आवश्यक असतो.
जर शरीर हे तुमचे बलस्थान नसेल, तर तो करण्याचे इतर मार्ग देखील आहेत. सध्या तुमच्या जीवनात केवळ चारच वास्तव आहेत - शरीर, मन, भावना आणि ऊर्जा. तुम्हाला स्वतःमध्ये जे काही घडवून आणायचे असेल, ते या चार स्तरांवरच घडवावे लागेल, कारण प्रवासाची सुरुवात तुम्ही जिथे आहात तिथूनच करू शकता. जर तुम्ही भावनांचा वापर करून परम अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याला आपण भक्तियोग म्हणतो - म्हणजे भक्तीचा मार्ग. जर तुम्ही बुद्धिमत्तेचा वापर करून परम अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याला ज्ञानयोग म्हणतात - म्हणजे बुद्धिमत्तेचा मार्ग. जर तुम्ही शरीर किंवा शारीरिक कृतीच्या माध्यमातून परम अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याला कर्मयोग म्हणतात - म्हणजे कृतीचा मार्ग. आणि जर तुम्ही तुमच्या ऊर्जेचे रूपांतर करून परम अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याला क्रिया योग म्हणतात, म्हणजेच आंतरिक कृती. स्वतःवर कार्य करण्याचे हेच चार मार्ग आहेत आणि प्रत्येक व्यक्ती या चार पैलूंचे मिश्रण आहे; त्यामुळे या चारही मार्गांचा समन्वय असलेली प्रक्रिया स्वीकारणे हेच सर्वात योग्य ठरते.
- सद् गुरू
(ईशा फाऊंडेशन)