पणजी :फोंडा टेबल टेनिस स्पोर्ट्स क्लब आणि गोवा टेबल टेनिस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने फातोर्डा येथील बहुउद्देशीय स्टेडियमवर आयोजित दुसऱ्या ‘ऑल गोवा मेजर रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत’ चंदन कारो आणि इशिता कुलासो यांनी दुहेरी मुकुट पटकावून निर्विवाद वर्चस्व गाजवले.
दोन गटांत विजेतेपदाची कमाल
अव्वल मानांकित चंदनने १५ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत रुहान शेखचा ३-० असा पराभव केला आणि १९ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीतही रिशान शेखवर तेवढ्याच (३-०) फरकाने मात केली.
दुसरीकडे, टॉप सीड इशिताने १५ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत आर्ना लोटलीकरवर ३-० असा विजय मिळवला, तर १९ वर्षांखालील मुलींच्या गटात नीझा कामतचा ३-१ असा पराभव करून विजेतेपदाचा मुकुट स्वतःकडे राखला.
११ वर्षांखालील गटातील विजेते
इतर अंतिम सामन्यांमध्ये, ११ वर्षांखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित अशांक दळवी याने संयमी खेळ करत आरिश शेखचा ३-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. याच वयोगटात मुलींच्या अंतिम फेरीत टॉप सीड अनाया शुक्ला हिने वॅनललह्रियापुई हिच्यावर ३-० असा एकतर्फी विजय नोंदवून विजेतेपदावर मोहोर उमटवली.
१३ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित ईशान कुलासो याने टॉप सीड युग प्रभू याचा ३-२ असा पराभव करून थरारक विजय मिळवला. तसेच, १३ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत द्वितीय मानांकित त्विशा शेख हिने टॉप सीड साची देसाई हिला ३-१ असे धक्कादायक रीतीने हरवून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.


