सलग ६ वर्ल्डकपमध्ये गोल करणारा जगातील पहिला खेळाडू

ह्युस्टन : फीफा विश्वचषक २०२६ मध्ये डीआर कांगोविरुद्ध पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर पोर्तुगालचा महान कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोला मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र रोनाल्डोने उझबेकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार पुनरागमन करत फुटबॉल जगतात आणखी एक सुवर्ण इतिहास रचला. सलग ६ वेगवेगळ्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये गोल करणारा तो जगातील पहिला खेळाडू बनला आहे.
मंगळवारी रात्री ह्युस्टन स्टेडियमवर उझबेकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सहाव्या मिनिटाला गोल करत रोनाल्डोने हा अद्वितीय पराक्रम केला. या सामन्यात पोर्तुगालने उझबेकिस्तानचा ५-० अशा मोठ्या फरकाने पराभव केला.
२३० व्या सामन्यात साधला दुहेरी धमाका
रोनाल्डोने आपला पहिला वर्ल्ड कप गोल २००६ मध्ये अवघ्या २१ व्या वर्षी केला होता. सध्या त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक १४५ गोलची नोंद आहे. उझबेकिस्तानविरुद्धचा हा त्याचा २३० वा आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात रोनाल्डोने ३९ व्या मिनिटाला आपला दुसरा वैयक्तिक गोल डागला. यासह तो वर्ल्ड कप इतिहासामध्ये पोर्तुगालसाठी सर्वाधिक १० गोल करणारा खेळाडू बनला आहे. त्याने दिग्गज खेळाडू युसेबिओ यांच्या ९ गोलचा विक्रम मोडीत काढला.
पोर्तुगालची ३-० अशी मजबूत आघाडी
सामन्याच्या सुरुवातीपासूनच पोर्तुगालचा संघ कमालीचा आक्रमक दिसला. या सामन्यात जोआओ कॅन्सेलोच्या लो-क्रॉसवर रोनाल्डोने ६ व्या मिनिटाला उजव्या पायाने शानदार शॉट मारत चेंडू जाळ्यात धाडला आणि ऐतिहासिक विक्रम करत पहिला गोल केला.
१४ व्या मिनिटाला उझबेकिस्तानच्या खामरोबेकोव्हने पेड्रो नेटोला फाऊल केल्यामुळे पोर्तुगालला फ्री-किक मिळाली. १७ व्या मिनिटाला रोनाल्डोने हुलकावणी देत चेंडू सोडला आणि नुनो मेंडेसने अचूक शॉट मारत स्कोअर २-० केला. दरम्यान, २९ व्या मिनिटाला उझबेकिस्तानच्या अझीझ गानिएव्हने गोल केला होता, मात्र रिव्ह्यूमध्ये तो फाऊल ठरल्याने नाकारण्यात आला.
३८ व्या मिनिटाला ब्रुनो फर्नांडिसने मिडफिल्डमधून अप्रतिम 'थ्रू-बॉल' दिला. रोनाल्डोने ३९ व्या मिनिटाला उझबेकिस्तानच्या डिफेन्सला भेदत शानदार गोल केला आणि हाफ टाईमपूर्वी पोर्तुगालला ३-० अशी आघाडी मिळवून दिली.
हाफ टाईमनंतर ५९ व्या मिनिटाला ब्रुनो फर्नांडिसच्या कॉर्नरवर जोआओ फेलिक्सने बॅक-हील फ्लिक केला, जो उझबेकिस्तानचा डिफेंडर अब्दुलकोदिर खुसानोव्हला लागून गोलकीपर नेमातोव्हच्या हातातून नेटमध्ये गेला. हा 'ओन गोल' मानला गेला आणि पोर्तुगालची आघाडी ४-० झाली.
रोनाल्डोची हॅटट्रिक हुकली
७३ व्या मिनिटाला रोनाल्डोकडे हॅटट्रिक पूर्ण करण्याच्या दोन मोठ्या संधी आल्या होत्या, मात्र उझबेकिस्तानचा गोलकीपर नेमातोव्हने उत्तम बचाव केल्यामुळे रोनाल्डोची हॅटट्रिक हुकली. अखेर ८७ व्या मिनिटाला मैदानावर बदली खेळाडू म्हणून आलेल्या राफेल लेआओने नेल्सन सेमेडोच्या पासवर पोर्तुगालचा ५ वा गोल नोंदवत विजयावर ५-० ने शिक्कामोर्तब केले.
पोर्तुगालचे बाद फेरीचे समीकरण
चालू वर्ल्ड कपमधील पोर्तुगालचा हा पहिला विजय आहे. पहिल्या सामन्यात डीआर काँगोविरुद्ध त्यांचा सामना १-१ असा ड्रॉ झाला होता. पोर्तुगाल ४ अंकांसह ग्रुप-के मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
या ग्रुपमधून कोलंबियाने सलग दोन विजय मिळवून ६ अंकांसह नॉकआऊट (बाद फेरी) मध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी दुसऱ्या सामन्यात डीआर काँगोचा १-० असा पराभव केला.
या लाजीरवाण्या पराभवामुळे उझबेकिस्तानचे आव्हान संपले असून, ते नॉकआऊटच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. डीआर काँगो संघ १ अंकासह तिसऱ्या स्थानावर आहे.
रोनाल्डोचा स्पर्धेतील ९ वा गोल
उझबेकिस्तानविरुद्ध केलेल्या गोलमुळे रोनाल्डोचे या टूर्नामेंटमध्ये ९ गोल झाले आहेत. दुसरीकडे, अर्जेंटिनाच्या पहिल्या सामन्यात अल्जीरियाविरुद्ध केलेली हॅटट्रिक आणि सोमवारी ऑस्ट्रियाविरुद्ध केलेल्या आणखी दोन गोल्समुळे मेसीचे एकूण १८ गोल झाले आहेत. यासह तो टूर्नामेंटच्या इतिहासामध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे.
रोनाल्डोने मेसीचा विक्रम मोडला
४१ वर्षांच्या रोनाल्डोने यापूर्वी २००६, २०१०, २०१४, २०१८ आणि २०२२ च्या वर्ल्ड कपमध्येही गोल केले आहेत. या ऐतिहासिक गोलसह त्याने अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसी याला मागे टाकले आहे. मेसीने २००६, २०१४, २०१८, २०२२ आणि २०२६ च्या वर्ल्ड कपमध्ये गोल केले आहेत, परंतु २०१० च्या वर्ल्ड कपमध्ये त्याला एकही गोल करता आला नव्हता.
विजयानंतर रोनाल्डो काय म्हणाला?
* रोनाल्डोने आपला दुसरा गोल हाफ टाइमपूर्वी करत पुर्तगालला मजबूत आघाडी मिळवून दिली. सामन्यानंतर त्यांनी मान्य केले की मागील आठवडा त्यांच्यासाठी सोपा नव्हता.
* हा खूप कठीण आठवडा होता. मला असे वाटत होते की मी फुटबॉलमधून निवृत्त झालो आहे. पण मी नेहमीप्रमाणे संयम ठेवला, कारण मला माझ्या मेहनतीवर सर्वाधिक विश्वास आहे.
* रोनाल्डोने संघातील कोणत्याही मतभेदांच्या चर्चाही फेटाळून लावल्या. तो म्हणाला, मला माहीत होते की माझे सहकारी माझ्या पाठीशी उभे राहतील. काळ कठीण होता, हे मी मान्य करतो, पण आता आम्ही परत आलो आहोत. मी खूप आनंदी आहे.
रोनाल्डोने रचला आणखी एक इतिहास
- ख्रिस्तियानो रोनाल्डो फीफा वर्ल्डकपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा त्याहून अधिक गोल करणारा सर्वात वयोवृद्ध खेळाडू ठरला आहे. या कामगिरीत त्याने अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेसीचा विक्रम मोडीत काढला.
- वर्ल्डकपमध्ये किमान एक गोल करणाऱ्या सर्वात वयोवृद्ध खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत त्याच्यापुढे फक्त रॉजर मिला आहेत, ज्यांनी ४२ वर्षे आणि ३९ दिवसांच्या वयात शेवटचा वर्ल्डकप गोल केला होता.
- रोनाल्डोने ४१ वर्षे आणि १३८ दिवसांच्या वयात गोल करत हा विक्रम नोंदवला आहे.