Home >> क्रीडा >> भारताचा पाकिस्तानवर ७-१ असा दणदणीत विजय

भारताचा पाकिस्तानवर ७-१ असा दणदणीत विजय

एफआयएच प्रो लीग हॉकी : सामन्यानंतर हस्तांदोलन करून जिंकली मने

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
27th June, 10:56 pm
भारताचा पाकिस्तानवर ७-१ असा दणदणीत विजय

लंडन : एफआयएच प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ७-१ अशा मोठ्या फरकाने पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला. लंडनमधील ली व्हॅली हॉकी अँड टेनिस सेंटर येथे झालेल्या या सामन्यात भारताने सर्वांगीण वर्चस्व गाजवत गुणतालिकेत स्पेनला मागे टाकत सातवे स्थान पटकावले. विशेष म्हणजे, पाकिस्तानविरुद्धचा भारताचा हा सलग १७ वा विजय ठरला.
सामना संपल्यानंतर भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन करत क्रीडाभावनेचे दर्शन घडवले. या कृतीची क्रीडा विश्वात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. सामन्याच्या १३ व्या मिनिटाला पाकिस्तानच्या अबू महमूद याने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, त्यानंतर भारतीय संघाने आक्रमक खेळ करत सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने दमदार पुनरागमन केले. १९ व्या मिनिटाला सुखजीत सिंगने गोल करत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर २६ व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने आपल्या खास ड्रॅग फ्लिकच्या जोरावर गोल नोंदवत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या बचावफळीची अक्षरशः दाणादाण उडवली. ३४ व्या मिनिटाला हार्दिक सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला. त्यानंतर अवघ्या एका मिनिटाने जुगराज सिंगने आणखी एक गोल करत भारताची आघाडी ४-१ अशी भक्कम केली. ४१ व्या मिनिटाला अभिषेकने गोल करत भारताला ५-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ४४ व्या मिनिटाला राजकुमार पाल आणि ५४ व्या मिनिटाला दिलप्रीत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत भारताच्या ७-१ अशा दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले. संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या हार्दिक सिंगला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
हस्तांदोलनाची सर्वत्र चर्चा
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानविरुद्ध 'नो हँडशेक' धोरण अवलंबले होते. मात्र, भारतीय हॉकी संघाने सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करत क्रीडाभावना आणि मैत्रीचा संदेश दिला. भारतीय संघाच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.