Home >> क्रीडा >> इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय वनडे संघाची घोषणा

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय वनडे संघाची घोषणा

विराट कोहलीचे पुनरागमन, जसप्रीत बुमराह ३ वर्षांनंतर परतला

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
21st June, 11:30 pm
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय वनडे संघाची घोषणा

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेला दुखापतीमुळे मुकलेल्या विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले असून, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील या संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे, मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती डाव्या पायाच्या दुखापतीमुळे आगामी आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. भारताचा इंग्लंड दौरा १ जुलै रोजी टी-२० मालिकेपासून सुरू होणार असून, १४ जुलैपासून ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल.
आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजेतेपद मिळवून देताना विराट कोहलीने १६ सामन्यांत ६७५ धावा कुटल्या होत्या. मात्र, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकला नव्हता. विराट २२ जून रोजी आपली फिटनेस चाचणी देणार असून, त्याचे खेळणे या चाचणीच्या मंजुरीवर अवलंबून असेल.
या संघाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या विश्वचषक फायनलनंतर बुमराह आपला पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दुखापतीमुळे अद्याप पुनरागमन न करू शकलेला हार्दिक पंड्या या संघात स्थान मिळवू शकलेला नाही. तसेच गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेल्या हर्षित राणाला संघात कायम ठेवण्यात आले आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या संघातून युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जैस्वालने अवघ्या एका दिवसापूर्वी चेन्नई येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावले होते, तरीही त्याला संघात स्थान मिळालेले नाही. दुसरीकडे, अफगाणिस्तानविरुद्ध लखनौ वनडेत ७९ चेंडूंत १२५ धावा ठोकणाऱ्या इशान किशनने संघात आपले स्थान कायम राखले असून, तो दुसरा यष्टीरक्षक फलंदाज असेल. अफगाणिस्तानविरुद्ध दमदार ७९ धावा करणारा अनुभवी फलंदाज रोहित शर्माही संघात कायम आहे. तसेच नवोदित वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने ३ सामन्यांत ७ बळी घेत निवडकर्त्यांना प्रभावित केल्यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्याचे तिकीट मिळाले आहे, तर महंमद सिराजला मात्र पुन्हा संधी मिळालेली नाही.
बीसीसीआयने आयर्लंडविरुद्ध २६ आणि २८ जून रोजी बेलफास्ट येथे होणाऱ्या दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठीही संघ जाहीर केला आहे. या मालिकेसाठी ३१ वर्षीय श्रेयस अय्यरकडे भारताचा नवा टी-२० कर्णधार म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मार्च २०२६ मध्ये भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयसची ही निवड झाली आहे.
या दौऱ्यात १५ वर्षीय स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो सर्वात युवा भारतीय खेळाडू ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या त्रिकोणीय मालिकेच्या फायनलमध्ये त्याने २९ चेंडूंत ९४ धावांची वादळी खेळी केली होती.
इंग्लंड मालिकेसाठी भारतीय वनडे संघ:
शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली (फिटनेसच्या अधीन), इशान किशन (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, गुरनूर ब्रार, विप्रज निगम, अनुकूल रॉय, अशोक शर्मा.