Home >> क्रीडा >> गोव्याचा १४ वर्षीय इथन वाझ बनला ग्रँडमास्टर

गोव्याचा १४ वर्षीय इथन वाझ बनला ग्रँडमास्टर

भारतातील सध्याचा सर्वात तरुण, तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनण्याचा बहुमान

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
27th June, 11:15 pm
गोव्याचा १४ वर्षीय इथन वाझ बनला ग्रँडमास्टर

पणजी : सारायेव्हो (बॉस्निया आणि हर्जेगोविना) येथे झालेल्या ‘चेस समर इन सारायेव्हो - जीएम मिक्स’ या स्पर्धेत गोव्याचा १४ वर्षीय बुद्धिबळपटू इथन वाझ याने आपला तिसरा आणि अंतिम ग्रँडमास्टर (जीएम) नॉर्म मिळवून ग्रँडमास्टर किताब पटकावला आहे. त्याने ९ फेऱ्यांमध्ये ७ गुणांची अपराजित नोंद करत या आंतरराष्ट्रीय जीएम स्पर्धेचे विजेतेपदही जिंकले. या अटी पूर्ण केल्यामुळे, तो सध्या भारतातील सर्वात तरुण, जगातील दुसरा सर्वात तरुण आणि भारताचा ९६ वा ग्रँडमास्टर ठरला आहे.
२२ ते २७ जून दरम्यान झालेल्या या नऊ फेऱ्यांच्या आंतरराष्ट्रीय स्विस स्पर्धेत १५ देशांतील ५६ खेळाडूंनी भाग घेतला होता. यात १० ग्रँडमास्टर, १३ आंतरराष्ट्रीय मास्टर आणि १५ फिडे मास्टर अशा एकूण ४८ मानांकित खेळाडूंचा समावेश होता. इथनने तीन ग्रँडमास्टर, तीन आंतरराष्ट्रीय मास्टर आणि तीन फिडे मास्टर अशा सर्व मानांकित प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळताना ५ विजय आणि ४ ड्रॉ नोंदवले. त्याने २६४३ चे प्रभावी रेटिंग प्रदर्शन केले असून, त्याच्या नऊपैकी सात प्रतिस्पर्ध्यांनी स्पर्धेतील पहिल्या दहांमध्ये स्थान मिळवले.
इथनने त्याचे तीनही जीएम नॉर्म आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धा जिंकतानाच मिळवले आहेत, जे त्याच्या सातत्याची आणि क्षमतेची साक्ष देते. ऑक्टोबर २०२५ मध्ये बॉस्निया आणि हर्जेगोविना येथील ‘जीएम४ फेस्टिव्हल शाहा बिजेल्जिना २०२५’ स्पर्धेत त्याने पहिला नॉर्म मिळवला होता आणि पुढे ती स्पर्धाही जिंकली होती. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये सर्बियातील ‘जीएम मिक्स ११ फॅन्टॅस्टिको’ स्पर्धेत त्याने शेवटच्या फेरीतील ‘मस्ट-विन’ सामन्यात २३९५ मानांकन असलेल्या फिडे मास्टरचा पराभव करून दुसरा नॉर्म आणि विजेतेपद पटकावले होते. आता सारायेव्होमध्ये त्याने पुन्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकताना तिसरा नॉर्म मिळवत आपला ग्रँडमास्टरचा प्रवास पूर्ण केला आहे.
सुधारित नियमांनुसार कामगिरी
जून २०२२ मध्ये फिडेने ग्रँडमास्टरचे नियम अधिक कडक केले असून, त्यानुसार प्रत्येक इच्छुकाला किमान एक जीएम नॉर्म वैयक्तिक स्विस स्पर्धेत मिळवणे अनिवार्य आहे. या सुधारित आणि अधिक कठीण नियमांनंतर ग्रँडमास्टरच्या अटी पूर्ण करणारा इथन हा सर्वात तरुण भारतीय ठरला असून, त्याने आपले तीनपैकी दोन नॉर्म स्विस स्पर्धांमध्ये मिळवले आहेत.
नियोजनातील बदल आणि यश
इथन याच काळात इटलीमध्ये होणाऱ्या फिडे जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत (१८ वर्षांखालील) भारताचे प्रतिनिधित्व करणार होता, मात्र वेळेत व्हिसा मंजूर न झाल्याने तो प्रवास करू शकला नाही. या निराशेतून बाहेर पडण्यासाठी त्याच्या पालकांनी तातडीने सर्बिया आणि बॉस्निया-हर्जेगोविना येथील स्पर्धांचे पर्यायी नियोजन केले, जिथे इथनने मिळालेल्या संधीचे सोने करत आपली ग्रँडमास्टर पदवी निश्चित केली.
जागतिक बुद्धिबळपटूंच्या एलिट रांगेत
अवघ्या १४ वर्षांच्या वयात इथनने जागतिक बुद्धिबळपटूंच्या एलिट रांगेत स्थान मिळवले असून, भारताच्या जागतिक बुद्धिबळ सामर्थ्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
विश्वविजेतेपदाचे स्वप्न
जेव्हापासून मी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून हे माझे ध्येय होते आणि ग्रँडमास्टरचा किताब मिळवल्याचा मला अत्यंत आनंद आहे. मी माझ्या खेळावर अधिक मेहनत घेत राहीन आणि विश्वविजेते होण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असे मितभाषी असलेल्या इथन वाझ याने सांगितले.
पालकांनी व्यक्त केला अभिमान
सात वर्षांचा असल्यापासून इथनचे जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर होण्याचे ध्येय होते. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिका-इराण युद्धामुळे स्पर्धेचे नियोजन कोलमडले नसते, तर त्याने हे नक्कीच साध्य केले असते. कोविड-१९ महामारीमुळे वाया गेलेली दोन वर्षे ही वेगळीच कथा आहे. आर्थिक अडचणींसह इतर सर्व आव्हानांचा विचार करता, इथनने सर्व व्यावहारिक अपेक्षांपेक्षा चांगली कामगिरी केली असल्याचा आम्हाला आनंद आहे. भारतासाठी ३० आंतरराष्ट्रीय पदके जिंकण्यापासून ते एफएम, आयएम आणि जीएम हे बुद्धिबळ किताब मिळवण्यापर्यंत त्याने मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले आहे. आम्ही त्याला उपलब्ध करून दिलेल्या अत्यंत कमी सुविधांमध्ये (exposure) त्याने जे काही साध्य केले आहे, त्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे, असे इथनच्या वडिलांनी सांगितले.
प्रशिक्षक आणि प्रायोजकांचे आभार
इथनला या स्तरावर पोहोचवल्याबद्दल आम्ही त्याचे प्रशिक्षक प्रकाश विक्रम सिंग, जीएम स्वयम्स मिश्रा आणि जीएम श्रीनाथ नारायणन यांचे आभार मानू इच्छितो. चोला चेस अकादमी आणि त्यांच्या माध्यमातून प्रो चेस ट्रेनिंग व जीएम आर. बी. रमेश यांच्यासह त्यांच्या सर्व प्रशिक्षकांचे मार्गदर्शनाबद्दल मोठे आभार. इथनचे प्रायोजक जेनो, हेल्पचेस फाउंडेशन, क्वांटबॉक्स, ग्रुप ई४, चोला चेस, द किंग्स स्कूल आणि इथनच्या क्राउडफंडिंग मोहिमेत देणगी देणाऱ्या सर्व मित्र व हितचिंतकांचेही आम्ही आभार मानतो. आम्ही इथनचे आजी-आजोबा, दिवंगत सेबस्टियाओ आणि दिवंगत लुईझा वाझ, तसेच मारियानो आणि एलिझा फर्नांडिस यांच्या आशीर्वादासाठी नेहमीच कृतज्ञ आहोत आणि विशेषतः एआयसीएफ (AICF), एसएआय (SAI), जीसीए (GCA) आणि एसएजी (SAG) यांच्या सततच्या मदतीसाठी व पाठिंब्यासाठी आभारी आहोत, असे इथनची आई लिंडा फर्नांडिस यांनी सांगितले.