एकदिवसीय मालिकेत ३-० ने ‘क्लीन स्वीप’ यशस्वी जैस्वालचे नाबाद शतक, प्रसिद्ध कृष्णाचे ५ बळी

चेन्नई: सलामीवीर यशस्वी जैस्वालचे शानदार नाबाद शतक (११०*) आणि रोहित शर्माच्या ७९ धावांच्या जोरावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा ९ गडी राखून धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासोबतच भारताने ३ सामन्यांची ही मालिका ३-० अशी खिशात घालत अफगाणिस्तानला ‘क्लीन स्वीप’ दिला. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या (५ बळी) जोरावर भारताने पाहुण्यांचा डाव २१८ धावांवर गुंडाळला होता, हे आव्हान भारताने अवघ्या २८.४ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात सहज पार केले.
चेन्नईच्या मैदानावर अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने सुरुवातीलाच अफगाण फलंदाजीचे कंबरडे मोडले. प्रसिद्धने आपल्या पहिल्याच चेंडूवर रहमानुल्लाह गुरबाजला बाद केले. त्यानंतर रहमत शाह, इब्राहिम झद्रान आणि दरविश रसुली यांना स्वस्तात माघारी धाडत प्रसिधने पहिल्या १० षटकांत (पॉवरप्ले) ४ बळी घेतले. त्यामुळे अफगाणिस्तानची अवस्था ४ बाद ३७ अशी झाली होती.
या कठीण परिस्थितीत कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने डाव सावरला. त्याने अझमतुल्लाह ओमरझाईसोबत (५० धावा) १०५ धावांची, तर मोहम्मद नबीसोबत (२१ धावा) ५७ धावांची भागीदारी केली. हशमतुल्लाने १२८ चेंडूंत १०२ धावांची झुंजार शतकी खेळी केली.
अखेर प्रिन्स यादव आणि गुरनूर ब्रार यांनी भागीदारी तोडल्यामुळे अफगाणिस्तानचा डाव ४४.२ षटकांत २१८ धावांवर आटोपला. प्रसिध कृष्णाने सामन्यात ५ बळी घेण्याची किमया साधली.
२१९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार हशमतुल्ला खेळपट्टीच्या ‘डेन्जर झोन’मध्ये धावल्यामुळे भारताला ५ धावांची पेनल्टी (दंडात्मक धावा) मिळाली, ज्यामुळे भारताने ५/० अशा धावसंख्येवरून डावाची सुरुवात केली.
रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी अफगाण गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत अवघ्या ६.१ षटकांत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. यशस्वी जैस्वालने अवघ्या ३८ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर रोहित शर्माने ४७ चेंडूंत ६२ वे एकदिवसीय अर्धशतक झळकावले.
अफगाणिस्तानच्या हातातून पूर्णपणे हिरावून घेतला. रोहित शर्मा ७९ धावांवर (४७ चेंडू) मोहम्मद नबीचा बळी ठरला. त्यानंतर यशस्वी जैस्वालने श्रेयस अय्यरच्या साथीने २८.४ षटकांत भारताला विजय मिळवून दिला. जयस्वालने आपल्या खेळीत शानदार शतक झळकावत नाबाद ११० धावा केल्या.
प्रसिद्ध कृष्णाचा ‘एलिट क्लब’मध्ये प्रवेश
सामन्याच्या पहिल्या १० षटकांत (पॉवरप्ले) ४ बळी घेणारा प्रसिद्ध कृष्णा हा भारताचा सातवा गोलंदाज ठरला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पॉवरप्लेदरम्यान सर्वाधिक बळी घेण्याचा भारतीय विक्रम मोहम्मद सिराजच्या (५ बळी, आशिया चषक २०२३ अंतिम सामना) नावावर आहे.