अफगाणिस्तानविरुद्ध आज दुसरी वनडे

लखनऊ : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (१७ जून) लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेल्या भारतीय संघाचे लक्ष्य हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचे असेल. त्याचबरोबर पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर काही युवा खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे.
धर्मशाळा येथे झालेल्या पहिल्या वनडेत पदार्पण करणाऱ्या फिरकीपटू हर्ष दुबे आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत प्रभावी कामगिरी केली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
रोहितला विश्रांती; जैस्वालला संधी?
पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना रोहित शर्माच्या मनगटाला चेंडू लागला होता. उपचारानंतर त्याने फलंदाजी सुरू ठेवली असली तरी धावताना तो काहीसा अस्वस्थ दिसत होता. त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याला विश्रांती देण्याचा विचार करू शकते. रोहितला विश्रांती दिल्यास युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला अंतिम अकरामध्ये संधी मिळू शकते. जैस्वालने यापूर्वी मिळालेल्या संधींचे सोने करत दमदार खेळी केल्या असून एका सामन्यात नाबाद शतकही झळकावले होते.
कुलदीप की हर्ष दुबे?
पहिल्या वनडेत अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादवऐवजी हर्ष दुबेला पदार्पणाची संधी देण्यात आली होती. हर्षने पाच षटकांत तीन विकेट्स घेत निवडीचे समर्थन केले. आयपीएलमधील सुमार कामगिरी आणि अलीकडील सामन्यांतील फॉर्ममुळे कुलदीपवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असले तरी वनडे क्रिकेटमधील त्याचा अनुभव संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे संघ व्यवस्थापनासमोर फिरकी विभागात निवडीचे मोठे आव्हान आहे.
विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय संघ व्यवस्थापन नव्या खेळाडूंना संधी देऊन संघाची बेंच स्ट्रेंथ तपासण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या सामन्यात काही बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मालिका जिंकण्याची संधी
पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाकडे मालिका विजयाची सुवर्णसंधी आहे. मात्र, युवा आणि उत्साही अफगाणिस्तान संघ भारताला कडवे आव्हान देण्यास सज्ज आहे.
प्रिंस यादवच्या पदार्पणाची शक्यता
पहिल्या सामन्यात गुरनूर ब्रारने यशस्वी पदार्पण केले. आता भारतीय संघात प्रिंस यादव हा एकमेव खेळाडू आहे ज्याला अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळालेली नाही. आयपीएल २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रिंसला इकाना मैदानाची चांगली माहिती आहे. त्याला संधी द्यायची झाल्यास पहिल्या सामन्यात विकेटविना राहिलेल्या प्रसिद्ध कृष्णाला बाहेर बसावे लागू शकते.
भारताची संभाव्य अंतिम अकरा : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा / यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा / प्रिंस यादव.