आरजीपीच्या कोअर कमिटीचा आमदार बोरकर गटाला धक्का

पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून १० सदस्यांची पक्षातून हकालपट्टी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26 mins ago
आरजीपीच्या कोअर कमिटीचा आमदार बोरकर गटाला धक्का

पणजी : रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षात (revolutionary Goans party) पुन्हा एकदा आग भडकली आहे. आरजीपीच्या कोअर कमिटीने आमदार वीरेश बोरकर (Viresh Borkar) यांना पुन्हा एक धक्का देत, पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून बोरकर यांच्या गटातील १० सदस्यांची पक्षातून हकालपट्टी (expelled form RGP) केली आहे. पक्षाचे सरचिटणीस विश्वेश नाईक (Vishvesh Naik) यांनी आदेश जारी करून पक्षांतर्गत वादाला पुन्हा तोंड फोडले आहे.

आमदार बोरकर यांचे समर्थक प्रशांत पागी, लिसिओ रोन्कोन, मनिला शिरोडकर, राहुल नाईक, प्रेमानंद गावडे, डॅगली फर्नांडिस, मेल्विन दा सिल्व्हा, विशाल देसाई, आदित्य देसाई आणि संजन नाईक हे पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप करत, त्यांना दणका देत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून काढून टाकण्यात आले आहे. ही शिस्तभंगाची कारवाई पक्षाच्या घटनेच्या आधारावर करण्यात आल्याचे विश्वेश नाईक यांनी म्हटले आहे.

या सदस्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून, जाहीर वक्तव्ये करून, पत्रकार परिषद घेऊन आणि अशा गोष्टींद्वारे पक्षविरोधी कारवाया करून पक्षाची प्रतिमा, ऐक्य, शिस्त आणि हेतू यांचे नुकसान केले आहे. तसेच पक्षात फूट पाडण्याच्या षडयंत्राची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. यामध्ये या सदस्यांनी मडगाव येथे अनधिकृत बैठक घेऊन पक्षाचे अध्यक्ष आणि कोअर कार्यकारी समितीत बदल करण्यावर चर्चा करून पक्ष आणि चिन्हावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही विश्वेश नाईक यांनी केला आहे.

कारवाईनंतर मनोज परब सक्रिय
आमदार वीरेश बोरकर यांच्या समर्थकांवर शिस्तभंगाची कारवाई झाल्यानंतर पक्षाचे माजी 'सुप्रिमो' मनोज परब (Manoj Parab) लगेचच सोशल मीडियावर सक्रिय झाले. महिनाभर मौन बाळगून असलेले परब यांनी व्हॉट्सॲपवर पोस्ट टाकून सांगितले की, "संयम ठेवा, सगळ्या गोष्टी जागेवर आणायला वेळ आणि मार्ग आहे." दुसऱ्या पोस्टमध्ये परब यांनी म्हटले आहे की, "एल निनोचा परिणाम म्हणजे ही आग. ही उष्णता प्रत्येक जण सोसू शकत नाही. काळजी घ्या."

हेही वाचा