नागरिक वार्ता : वाहून जाणारे पाणी, जलाशयातील गाळामुळे अंजुणे धरणाला ‘तहान’

सत्तरीतील जनतेला फटका : दीर्घकालीन उपाययोजनांची गरज

Story: चंद्रशेखर गावस |
16th June, 11:31 pm
नागरिक वार्ता : वाहून जाणारे पाणी, जलाशयातील गाळामुळे अंजुणे धरणाला ‘तहान’

सत्तरी : अंजुणे धरणातील (Anjunem dam Goa) पाण्याच्या समस्येला विलंब झालेला पाऊस हे एक कारण आहे. धरणातील पाण्याचे नियोजन न केल्यामुळे ते वाहून जाते. शिवाय जलाशयात प्रचंड प्रमाणात साचलेला गाळ ही दोन महत्त्वाची कारणेही या धरणातील पाणी पातळी घटण्यास कारणीभूत ठरली आहेत.

धरणातील पाणी पुरवठ्याचे ज्या प्रकारे नियोजन व्हायला हवे त्या प्रकारे ते होत नाही. त्यावर कोणाचाच अंकुश नाही. अधिकांश पाणी वाहून जात असल्याने वाया जाते. त्याचा कोणत्याही शेतजमिनीला फायदा होत नाही. वाहून जाणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यात संबंधित खाते अपयशी ठरले आहे. लोकांमध्ये तसेच शेतकऱ्यामध्ये पाणी वापरासंबंधी शास्त्रोक्त मार्गदर्शन होत नाही. कार्यालयात बसणारी मंडळी प्रत्यक्ष आणि नियमित निरीक्षण करत नाहीत. सुपरवायझर नेमलेले आहेत ते वरिष्ठापर्यंत काय रिपोर्ट देतात हे त्याचे त्यांनाच ठाऊक, अशी स्थिती आहे.

धरणाच्या जलाशयात गेल्या कित्येक वर्षांपासून साचलेला गाळ काढणे आवश्यक आहे. त्याकडे लक्ष दिले जात नाही. या संदर्भात निविदा काढली असे सांगितले जाते, परंतु त्यावर कार्यवाही कधी होणार? धरणाच्या पाण्याची पातळी ९३ मीटरच्या आसपास आहे, परंतु साचलेल्या गाळामुळे प्रत्यक्ष जेवढी पातळी अपेक्षित आहे, तेवढी पातळी गाठली जात नाही. तो गाळ उपसला असता, तर आज अंजुणे धरणाच्या पाण्याच्या पातळीची ही अवस्था नसती.

जल नियोजनाचे प्रशिक्षण आवश्यक
- ज्या पाणी वाटप सहकारी संस्था स्थापन झालेल्या आहेत, त्यांना जल नियोजनाचे प्रशिक्षण देणे आणि पाणी वाचवण्यासाठीच्या प्रयत्नांसाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
- धरणाचे दोन मुख्य कालवे ठिकठिकाणी उखडले आहेत. त्यांची दुरुस्ती करणे करजेचे आहे. उपकालवे तसेच शेतजमिनीत असलेल्या चेंबरना गळती लागलेली आहे. त्याकडे या सोसायटींनी लक्ष देणे अपेक्षित आहे.
- अनेक ठिकाणी नादुरुस्त झालेल्या जलवाहिन्या तशाच महिनोनमहिने दुर्लक्षित असतात. याकडे सोसायट्या आणि जलसिंचन विभाग किती गंभीरपणे पाहतो, हा खरा प्रश्न आहे.      

हेही वाचा