अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याप्रकरणी युवकाला अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
14 mins ago
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याप्रकरणी युवकाला अटक

पणजी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून मातृत्व लादल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी संशयित मीर शाह (२० वर्षे, मूळ उत्तर प्रदेश) या युवकाला अटक केली आहे. संशयित घटनेनंतर राज्याबाहेर गेला होता. तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधून पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिचोलीतील एका १५ वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान संशयित आणि पीडिता एकाच परिसरात राहत असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस), गोवा बाल कायदा तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडितेचा जबाब नोंदविणे, वयाची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यासह आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

संशयित राज्याबाहेर गेल्याने त्याचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात त्याचा माग काढण्यात आला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन न्यायालयाकडून ट्रान्झिट वॉरंट मिळविण्यात आले. त्यानंतर आरोपीला गोव्यात आणण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास डिचोली पोलीस (Bicholim Police) करीत आहेत.

अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिल्यानंतर प्रकरण उघडकीस

दरम्यान, बलात्कारानंतर १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली व नंतर तिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. 

हेही वाचा