तोरसे येथील फसवणूकप्रकरणी तिघांना धुळ्यातून अटक

पेडणे : नागा साधूचा वेश धारण करून विश्वास संपादन करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या तिघांना मोपा विमानतळ पोलिसांनी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातून अटक केली आहे. नरुनाथ मदारी, दीपकनाथ मदारी आणि जननाथ मदारी अशी आरोपींची नावे असून, त्यांना ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणून १४ जून रोजी अटक करण्यात आली.
८ जून रोजी तोरसे-पेडणे येथील सूर्यकांत मुकुंद वीर यांची फसवणूक करण्यात आली होती. आरोपींनी आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने सोन्याची चैन, अंगठी आणि २,६०० रुपये रोख रक्कम असा सुमारे १.२० लाख रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले होते.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, वाहनाचा मागोवा आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. गुजरात नोंदणीच्या फोक्सवॅगन पोलो कारच्या आधारे आरोपी धुळे जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले. धुळे पोलिसांच्या सहकार्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सोन्याची चैन व अंगठी जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपींनी इतरत्रही अशाच प्रकारच्या फसवणुका केल्या आहेत का, याचा तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सलीम शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुढील तपास पीएसआय सागर वाझरकर करीत आहेत.
धुळे पोलिसांच्या मदतीने तिघांना बेड्या
संशयित आरोपी महाराष्ट्राच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट होताच, गोव्याच्या पोलीस पथकाने धुळे जिल्हा आणि गुजरात पोलिसांच्या सहकार्याने तिघा संशयितांना धुळ्यातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याची चैन आणि अंगठी जप्त करण्यात आली आहे. १४ जून रोजी तिन्ही आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणून अधिकृतपणे अटक करण्यात आली. न्यायालयाने संशयितांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.