झाडे छाटण्याच्या मशीनपासून विरोधी नगरसेवक वंचीत

पणजीच्या विरोधी नगरसेवकांचा आरोप

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
6 hours ago
झाडे छाटण्याच्या मशीनपासून विरोधी नगरसेवक वंचीत

पणजीः पणजी महानगरपालिकेत (Corporation Of The City of Panaji) सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव सुरू आहे. महापौर झाडांची छाटणी करण्याच्या मशीनपासून विरोधी नगरसेवकांना वंचीत ठेवत आहेत. दीड महिना जास्त झाला विरोधी नगरसेवकांच्या प्रभागात धोकादायक झाडांच्या फांद्या अजून छाटलेल्या नाहीत. पालिकेच्या या भेदभावामुळे आम्हाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते, असा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला. 

पणजी महानगरपालिकेच्या तीन विरोधी नगरसेवकांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत हा विषय मांडला. यावेळी प्रभाग १७ चे नगरसेवक जॅक सुखीजा, प्रभाग २९ चे नगरसेवक लिबेर्टा फर्नांडीस आणि प्रभाग ७ चे लीयोनीड फुर्तादो उपस्थित होते. 

पावसापूर्वी झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी आम्हा सर्व नगरसेवकांना ‘स्काय लिफ्ट’ हे मशीन मिळते. ३० मार्च पासून महानगरपालिका गठीत झाल्यापासून आम्हा तिघाही नगरसेवकांना एका तासासाठी सुद्धा हे मशीन दिले नाही, असा आरोप फुर्तादो यांनी केला. 

पणजीच्या एकूण ३० प्रभागांसाठी दोन ‘स्कायलिफ्ट’ आणि फांद्या छाटण्याचे मशीन आहे. तुम्ही सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागात प्रथक मशीन दिले तरी आम्हाला काहीच समस्या नाही. पण आता मार्च, एप्रिल, मे महिना होऊन आम्ही आता जून महिन्यात आहोत. अडीच महिने होऊन गेले, पण महापालिकेकडून आम्हाला मशीन पाठवण्यासाठी एक तास सुद्धा नाही, अशी तक्रार फुर्तादो यांनी केली.

टोंक येथे वास्तव्यास असलेल्या माझ्या मतदाराच्या वाहनावर झाड कोसळले. दैव बलवत्तर म्हणून तो वाहनात नव्हता नाहीतर जीवावर बेतले असते. तुम्ही मशीन न पाठवता पणजीच्या नागरिकांना वंचीत ठेवत आहात. जास्त लोक आर्थ‌िकदृष्ट्या मागासलेले आहेत. जर एखादे झाड घरावर पडून नुकसान झाल्यास ते दुरूस्त करणे त्यांना शक्य नाही. त्यासाठी लोक आम्हाला प्रश्न विचारतात आणि आम्हाला मतदारांना तोंड दाखवणे सुद्धा कठीण झाले असल्याचे फुर्तादो म्हणाले. 

३० मार्चला उप-महापौर यांच्याकडे मशीनचा ताबा देऊन त्यांना मशीन प्रत्येक प्रभागात पाठवण्याची जबाबदारी दिली होती. आम्ही त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला महापौरांना भेटायला सांगितले. नंतर आम्ही महापौर आणि आयुक्ताची भेट घेतली. पण त्यांनी उप-महापौराकडे बोट दाखवले. तुम्ही आमची का सतावणूक करत आहात, असे विचारणारी अनेक पत्रे लिहिली पण उत्तर मिळाले नाही, असे फुर्तादो म्हणाले. 

या भेदभावामुळे आपला एक मतदार रागावला. तुम्हाला निवडून आणून काहीच फायदा नाही. झाडे छाटण्याचे काम मी स्वत: केले, असे शब्द आम्हाला ऐकून घ्यावे लागले, अशी तक्रार जॅख सुखीजा यांनी केली. ७५ दिवसांमधील एक दिवस तरी हे मशीन झाडे छाटण्यासाठी देणे आवश्यक होते. ऐन वेळी तुम्ही सांगत आहात की, मशीन दुसरीकडे पाठवले आहे आणि देणे शक्य नाही. ही एक आवश्यक सेवा आहे. त्यामुळे झाडे छाटण्याचा विषय येतो, तेव्हा तुम्ही आम्हाला विश्वासात घ्यावे, अशी मागणी सुखीजा यांनी केली. 

 


हेही वाचा