गोव्यातील ऐच्छिक रक्तदात्यांच्या प्रमाणात २७ टक्क्यांनी वाढ : यतींद्र मराळकर


5 hours ago
गोव्यातील ऐच्छिक रक्तदात्यांच्या प्रमाणात २७ टक्क्यांनी वाढ : यतींद्र मराळकर

पणजी : आरोग्य खात्याने (Health Department, Goa)  केलेली जागृती, स्वयंसेवी व अन्य संस्थांनी राबवलेली रक्तदान शिबिरे व चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध झाल्याने राज्यात ऐच्छिक पद्धतीने रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण २७ टक्क्यांनी वाढल्याची माहिती खात्याचे सचिव यतींद्र मराळकर यांनी दिली. 

पर्वरी येथे जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. जास्मिन पिंटो, डॉ. सुनीता आर्लेकर, डॉ. प्रियांका माशेलकर, गौरीश धोंड, विजय जगताप व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

मराळकर यांनी सांगितले की, राज्यात २००५ मध्ये  संकलित झालेल्या एकूण रक्ताच्या युनिट पैकी ५३ टक्के युनिट हे ऐच्छिक रक्तदानातून झाले होते. २०२५ अखेरीस याचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. 

सातत्यपूर्ण जागृती मोहिमा, लोकांपर्यंत पोहोचण्याचे विविध प्रयत्न, रक्त संक्रमण सेवांचे बळकटीकरण, खात्यातील कर्मचाऱ्यांची दृढ निष्ठा या सर्वांमुळे हे शक्य झाले आहे. योग्य कृती, जन-शिक्षण आणि नैतिक कार्यपद्धती यांच्या जोरावर अनेक गोष्टी साध्य करता येतात. 

ते म्हणाले, ऐच्छिक रक्तदात्यांचे प्रमाण वाढले तरी सुरक्षित रक्त सर्वांना उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत  काही आव्हाने कायम आहेत. रक्त तपासणी आणि साठवणुकीचे उच्च दर्जाचे निकष राखणे, रक्तदात्यांना या प्रक्रियेशी जोडून ठेवणे ही यातील महत्त्वाची आव्हाने आहेत. त्याचबरोबर रक्तदानाबाबत लोकांच्या मनात असलेली भीती दूर करणेही आवश्यक आहे. पायाभूत सुविधा बळकट करणे, जनजागृती वाढवणे आणि तरुणांना रक्तदानाच्या कार्यात सहभागी करून घेण्यावर भर दिला पाहिजे.

आपण आतापर्यंत मिळवलेले यश टिकवून त्यात अधिक प्रगती करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यावर्षीच्या मोहिमेत प्रत्येक रक्तदानाच्या केंद्रस्थानी 'मानवता' या भावनेला प्राधान्य देण्यात आले आहे. ही मोहीम आपल्याला आठवण करून देते की, रक्तदान ही केवळ एक वैद्यकीय प्रक्रिया नाही. तर ती एकता, करुणा आणि सामायिक जबाबदारीचे एक सशक्त प्रतीक आहे. वेळेवर रक्त मिळणे अत्यंत गरजेचे असते. तुम्ही दिलेले रक्त तिघांचे प्राण वाचवू शकते असे प्रतिपादन मराळकर यांनी केले.

रक्तदान करणाऱ्यांना थेट देवदर्शन 

केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे इच्छित फळदेसाई  यांनी सांगितले की, मंडळातर्फे २०२३ पासून एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला रांगेत उभे न करता थेट देवदर्शन दिले जाते. मागील वर्षी ४०० हून अधिक भक्तांनी रक्तदान करून देवदर्शन घेतले. यंदाही हा उपक्रम सुरू राहणार आहे.

हेही वाचा