पीडितांची माहिती सादर करण्याचे ॲमिकस क्युरीना निर्देश

पणजी : बर्च नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याच्या प्रक्रियेला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court, Goa) गती दिली आहे. पीडितांची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश ॲमिकस क्युरीना दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जुलै रोजी होणार आहे.
हडफडे येथील बर्च क्लबला ६ डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले होते. या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने ‘स्वेच्छा दखल’ घेतली आहे. या प्रकरणाची सोमवारी सुनावणी झाली असता, अग्नितांडवात मृत्यू पावलेल्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी न्यायालयाने पुढाकार घेतला आहे.
या संदर्भात पुढील सुनावणीत विषय हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी न्यायालयाने वरील निर्देश जारी केले. त्यात न्यायालयाने ॲमिकस क्युरी ॲड. रोहित ब्रास डीसा यांना कर्मचाऱ्यांबाबत सविस्तर माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यामध्ये मृतांचे वय, त्यांच्या कुटुंबातील अवलंबितांची संख्या, नोकरीचा प्रकार आणि पदाचे नाव यांची माहिती मागितली आहे. ही माहिती नुकसानभरपाईची रक्कम ठरवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय कुटुंबीयांची बाजू मांडण्यासाठी गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाला एका वकिलाची नेमणूक करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जुलै रोजी होणार आहे.