नवी दिल्लीत लोकसभा अध्यक्षांकडे सोपवले पत्र

नवी दिल्ली : संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी देशाच्या राजकीय वर्तुळात एक मोठी खळबळजनक घडामोड समोर आली आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) मधील अंतर्गत कलह आता टोकाला पोहोचला असून, पक्षाच्या २० बंडखोर खासदारांनी थेट 'नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी' (NCP) मध्ये विलीन होण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखाली या बंडखोर गटाने नवी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातील अधिकृत पत्र सुपूर्द केले.
या पत्राद्वारे बंडखोर गटाने संसदेत आपल्यासाठी वेगळी आसनव्यवस्था करण्याची मागणी केली असून, भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोबत काम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे
राजकीय विश्लेषकांच्या मते, तृणमूल काँग्रेससाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे एकूण २८ खासदार असून, बंडखोरी केलेले २० खासदार हे एकूण संख्याबळाच्या दोन-तृतीयांशपेक्षा जास्त आहेत. पक्षांतर बंदी कायद्याची झळ बसू नये म्हणून बंडखोरांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याऐवजी थेट दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा फंडा वापरला आहे. या राजकीय स्थलांतरामुळे तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संकट अधिक गडद झाले असून, संसदेच्या कनिष्ठ सभागृहात विरोधकांचे 'नेटवर्क' आणि संख्याबळ मोठ्या प्रमाणावर कमकुवत होण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात या राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रीय पातळीवरील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलणार आहे.