बंडी जॅकेटला मान्यता; भारतीय लष्करात गणवेश नियमावलीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने रविवारी ब्रिटिशकालीन परंपरांपासून दूर जात गणवेश नियमावलीत मोठे बदल केले आहेत. नव्याने जारी करण्यात आलेल्या ‘आर्मी युनिफॉर्म्स-२०२६’ या १७४ पानी नियमपुस्तिकेत भारतीय संस्कृती, स्वदेशी ओळख आणि आधुनिक गरजांशी सुसंगत असे अनेक बदल करण्यात आले आहेत. अशी नियमावली यापूर्वी आठ वर्षांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती.
प्रथमच लष्करी अधिकाऱ्यांना औपचारिक पोशाखाचा भाग म्हणून क्लोज-नेक बंडी जॅकेट परिधान करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हे जॅकेट पूर्ण बाह्यांच्या शर्टवर घालता येणार असून त्यासोबत साध्या रंगाची औपचारिक पँट आणि बंद बूट वापरणे बंधनकारक असेल. लष्कराने सर्व पदांसाठी ‘३बी’ नावाचा नवा हिवाळी गणवेशही लागू केला आहे. यात अँगोला शर्ट, बॅटल जॅकेट आणि बेरेट टोपीचा समावेश असेल.
समारंभिक ड्रेस क्रमांक ५ आणि ६ मधून पाऊच बेल्ट काढून टाकण्यात आला आहे. तसेच परेडदरम्यान निरीक्षण करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी तलवार बाळगणे आता ऐच्छिक करण्यात आले आहे. काही विशिष्ट रेजिमेंटमध्ये मात्र समारंभिक प्रसंगी पाऊच बेल्ट वापरण्याची मुभा कायम ठेवण्यात आली आहे.
नव्या नियमावलीत औपनिवेशिक काळातील ‘रॉयल’ यांसारखे शब्दही वगळण्यात आले आहेत. लष्कराचे अॅडज्युटंट जनरल लेफ्टनंट जनरल व्ही. पी. एस. कौशिक यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे की, ही नियमावली भारतीय मूल्यांशी सुसंगत अशी असून औपनिवेशिक परंपरा, संज्ञा आणि उपकरणे टप्प्याटप्प्याने हटविण्याचा प्रयत्न आहे.
पंतप्रधान मोदींनी २०२१ मध्ये गुजरातमधील केवडिया येथे झालेल्या संयुक्त कमांडर्स परिषदेत सशस्त्र दलांनी औपनिवेशिक परंपरा सोडून भारतीय पद्धती स्वीकाराव्यात, असे निर्देश दिले होते. त्यानंतर लष्कराच्या स्वदेशीकरण मोहिमेला वेग मिळाला असून, नव्या गणवेश नियमावलीकडे त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
महिलांसाठीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे
नव्या नियमांनुसार महिला अधिकाऱ्यांना साध्या रंगाच्या साड्या, कुर्ता-सलवार किंवा दुपट्ट्यासह सरळ पँट परिधान करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, स्लीव्हलेस कुर्ते, पॅलाझो आणि सिगारेट पँटसारखे अनौपचारिक पोशाख प्रतिबंधित करण्यात आले आहेत.