जिवंत क्षेपणास्त्रासह तेल टँकर भारतात दाखल

ओमानच्या किनाऱ्यावर हल्ला, भारतीय नौदलाने केले निकामी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
13th June, 08:22 pm
जिवंत क्षेपणास्त्रासह तेल टँकर भारतात दाखल

कोची: संयुक्त अरब अमिरातीच्या फुजैराह येथून कोची बंदरात आलेल्या एका तेलवाहू जहाजातून (ऑइल टँकर) भारतीय नौदलाने एक जिवंत क्षेपणास्त्र सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. या जहाजाने जिवंत क्षेपणास्त्रासह अरबी समुद्रातून सुमारे २,००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला होता. नौदलाच्या या यशस्वी आणि धाडसी मोहिमेमुळे सागरी क्षेत्रातील एक खूप मोठे संकट टळले आहे.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी ओमानच्या किनाऱ्याजवळ एमटी ऑलिम्पिक या ऑइल टँकरवर हल्ला झाला होता. या जहाजावर मार्शल बेटांचा ध्वज होता.
क्षेपणास्त्राचे वॉरहेड इंधन टाकीत अडकले होते
ओमानच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यादरम्यान हे क्षेपणास्त्र जहाजावर आदळले, मात्र सुदैवाने त्याचे वॉरहेड फुटले नाही. ते टँकरच्या बाहेरील लोखंडी भागाला भेदून थेट आत घुसले आणि मुख्य इंधन टाकीत जाऊन अडकले. अशा अत्यंत संवेदनशील स्थितीत या टँकरने २,००० किलोमीटरचा प्रवास करत भारताचे कोची बंदर गाठले. जहाजाच्या आत जिवंत क्षेपणास्त्र असल्याची माहिती मिळताच, भारतीय नौदलाने तातडीने एक अति-धोकादायक आणि गोपनीय रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले.
भारतीय नौदलाचे ‘मिशन कोची’
कोची येथील दक्षिण नौदल कमांडने स्फोटके निकामी करण्यात निष्णात असलेल्या आपल्या एक्सप्लोसिव्ह ऑर्डनन्स डिस्पोजल टीमला तातडीने जहाजावर पाठवले. या संपूर्ण मोहिमेचे नियंत्रण गुरुग्राम येथील नौदलाच्या इन्फॉर्मेशन फ्युजन सेंटर-इंडियन ओशन रिजन कडून केले जात होते. तपासात असे दिसले की, क्षेपणास्त्राने टँकरच्या बाहेरील भागाचे मोठे नुकसान केले होते आणि ते थेट इंधनाच्या संपर्कात होते. थोडी जरी चूक झाली असती, तर जहाजासह संपूर्ण कोची बंदर आणि आजूबाजूचा परिसर मोठ्या स्फोटाने हादरला असता. इओडी टीमने अत्यंत सावधगिरी बाळगत आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने प्रथम वॉरहेडच्या स्फोटक यंत्रणेचा शोध घेतला आणि ती यशस्वीरीत्या निष्क्रिय केली. स्फोटक यंत्रणा निकामी केल्यानंतर, तज्ज्ञांनी ते वॉरहेड आणि त्याचा ढिगारा टँकरमधून सुरक्षितपणे बाहेर काढला. हे वॉरहेड आता पुढील तांत्रिक तपासणीसाठी नौदलाच्या एका सुरक्षित तळावर पाठवण्यात आले आहे.
हल्ल्यानंतर तेल गळती, तरीही प्रवास सुरूच
ओमानची राजधानी मस्कटपासून अवघ्या १.८ किलोमीटर अंतरावर या टँकरच्या डाव्या बाजूला पाण्याच्या पातळीजवळ एक मोठा स्फोट झाला होता. सुरुवातीला जहाजाचे कामकाज पाहणाऱ्या स्प्रिंगफील्ड शिपिंग कंपनीने एखाद्या अज्ञात वस्तूने टँकरला धडक दिल्याचे म्हटले होते. या स्फोटामुळे टँकरचे नुकसान होऊन काही प्रमाणात खनिज तेल समुद्रातही वाहून गेले होते. मात्र, जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवास सुरूच ठेवला. नंतर टँकरच्या आत जिवंत क्षेपणास्त्र अडकल्याचे स्पष्ट झाल्यावर भारतीय नौदलाला याची अधिकृत माहिती देण्यात आली.
लष्कर कोणत्याही संकटाचा सामना करण्यास सक्षम
या यशस्वी मोहिमेनंतर संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. मंत्रालय म्हणाले की, हे ऑपरेशन अत्यंत आव्हानात्मक आणि जिवावर बेतणारे होते, परंतु नौदलाने ते पूर्ण कौशल्याने पार पाडले. टँकर कोणत्या देशाचा होता किंवा त्यावर कोणते नागरिक होते, याचा विचार न करता भारताने ही मदत केली. हे ऑपरेशन सागरी सुरक्षेप्रती भारताची कटिबद्धता आणि या क्षेत्रातील भारताची मजबूत व विश्वासार्ह भूमिका अधोरेखित करते.

हेही वाचा