शाळेच्या तिजोरीतून १.८ कोटींची रोकड जप्त; अकाउंटंटसह दोघांना अटक

पश्चिम बंगालमधील घटना

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
2 hours ago
शाळेच्या तिजोरीतून १.८ कोटींची रोकड जप्त; अकाउंटंटसह दोघांना अटक

कोलकाता : पश्चिम बंगालमधील कांचरापारा येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून तब्बल १.८ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आले. पोलिसांनी बुधवारी रात्रीपासून सुरू केलेल्या शोधमोहीमेदरम्यान ही रोकड शाळेतील एका बंद खोलीतील तिजोरीतून जप्त केली. या प्रकरणी शाळेचा अकाउंटंट आणि ज्युनिअर अकाउंटंट अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई फोरमन कॉलनीतील हार्नेट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करण्यात आली. पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवून गुरुवारी पहाटे रोकड मोजणी पूर्ण केली. या प्रकरणी शाळेचे कार्यवाहक प्राचार्य बिकाश चंद्र पाल यांनी बिजपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शाळेच्या निधीचा अपहार, गैरव्यवहार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी शाळेशी संबंधित चार जणांवर केला आहे.

बॅरकपूर पोलीस आयुक्तालयाच्या नॉर्थ झोनचे डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान सुमारे १.८ कोटी रुपयांची रोकड, काही कागदपत्रे आणि संगणकीय उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. रोख रकमेबरोबरच शाळेच्या परिसरात मद्याच्या बाटल्या, कंडोमची पाकिटे व बेडरुम आढळल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या आजारपणासाठी राखीव असलेल्या खोलीतून हे साहित्य सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. जबाबांमध्ये विसंगती आढळल्यानंतर अकाउंटंट अभिक कुमार नाग आणि ज्युनिअर अकाउंटंट सायन पाल यांना अटक करण्यात आली.

एफआयआरमध्ये कांचरापारा नगरपालिकेचे माजी अध्यक्ष आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कमल अधिकारी, समिती सदस्य गौतम घोष दस्तीदार, अभिक नाग आणि सायन पाल यांची नावे आहेत. नाग आणि पाल पोलिसांच्या ताब्यात असून अधिकारी आणि दस्तीदार फरार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, जप्त रकमेचा स्रोत आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अनियमितता झाली का, याचा तपास सुरू आहे.

हेही वाचा