मुख्य परीक्षेत उत्तम गुण मिळवूनही फेरपरीक्षेतील कमी गुणांमुळे चिठ्ठी लिहून संपवले जीवन

अहिल्यानगर : 'नीट' युजी २०२६ फेरपरीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील जलालपूर येथील अंकिता सांगळे (वय १९) या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याने आणि मानसिक ताणातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकिताची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच होती. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करून डॉक्टर बनण्याचे तिचे ध्येय होते. 'नीट'च्या पहिल्या मुख्य परीक्षेत तिने उत्तम गुण मिळवले होते. मात्र, देशभरात वादग्रस्त ठरलेल्या पेपरफुटीच्या प्रकरणांनंतर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेला फेरपरीक्षा घ्यावी लागली.
या फेरपरीक्षेत अंकिताला १६६ गुण मिळाले, जे कट-ऑफ गुणांपेक्षा कमी होते. पहिल्या परीक्षेतील यश आणि त्यानंतर फेरपरीक्षेमुळे झालेला मनस्ताप या दुहेरी तणावामुळे ती पूर्णपणे खचून गेली होती.
शनिवारी घरातील सदस्य बाहेर गेलेले असताना अंकिताने स्वतःच्या अभ्यासाच्या खोलीत आयुष्य संपवले. तिचे वडील आणि भाऊ आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेले होते, तर आई घरकामात व्यस्त होती. अभ्यासाच्या खोलीतून बराच वेळ कोणतीही हालचाल न दिसल्याने आईने पाहणी केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
पोलिसांना अंकिताने लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. 'नीट' परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळेच हे पाऊल उचलत असल्याचे सांगत तिने पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्याबद्दल त्यांची क्षमा मागितली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच नाशिक येथील यश गोसावी या विद्यार्थ्यानेही अशाच प्रकारच्या शैक्षणिक तणावातून आत्महत्या केली होती. सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून केंद्रीय शिक्षण व्यवस्था व परीक्षा यंत्रणेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
देशभरातील 'नीट' पेपरफुटीच्या वादानंतर आता महाराष्ट्रातही भरती परीक्षेवरून वाद सुरू झाला आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या राज्य औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर दोन दिवस आधीच फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. १०० पैकी ९० प्रश्न व्हॉट्सॲप व टेलिग्रामवर व्हायरल झाल्याचे स्क्रीनशॉट्स समोर आले असून, प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची लाच मागितल्याचाही दावा केला जात आहे. या प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.