पणजी पोलिसांकडून चौकशी; आज पुन्हा हजर राहण्याच्या सूचना

पणजी : सीजेपी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पोलीस मुख्यालयाबाहेर शनिवारी रात्री प्रचंड तणाव निर्माण झाला. या गोंधळादरम्यान एका महिला नगरसेविकेशी गैरवर्तन करून अश्लील शिवीगाळ व विनयभंग केल्याच्या आरोपावरून सुदीप दळवी यांच्याविरोधात पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी दळवी यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले असून, प्राथमिक चौकशीनंतर सोमवारी पुन्हा हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पीडित महिला नगरसेविकेने तक्रारीत नमूद केले आहे की, पोलीस मुख्यालयाबाहेर झालेल्या गदारोळादरम्यान सुदीप दळवी यांनी तिच्याशी गैरवर्तन करत अश्लील शिवीगाळ केली आणि विनयभंग केला. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला असून, पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनात तोंडावर रुमाल आणि मास्क बांधून आलेल्या मोहम्मद दानिश याने अचानक 'फ्री उमर खालिद' असा मजकूर असलेले पोस्टर उंचावले. संशयास्पद हालचाली लक्षात घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी करत ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. मात्र, त्याने सहकार्य करण्यास नकार दिल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
दानिशला ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी त्याच्या सुटकेची मागणी करत पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलक आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाला. दुसरीकडे, भाजप कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी प्रति-आंदोलन करत विरोधकांवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राजकारण केल्याचा आरोप केला. त्यामुळे दोन्ही गट आमनेसामने आल्याने वातावरण अधिकच तापले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी रविवारी मोहम्मद दानिशवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
‘फ्री उमर खालिद’ पोस्टरमुळे तणाव
नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनात 'फ्री उमर खालिद' असा मजकूर असलेले पोस्टर फडकवल्याने शनिवारी पणजीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी मोहम्मद दानिश याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी पोलीस मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर सीजेपी आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.