एक संशयित अटकेत : दुसऱ्याचा शोध जारी

म्हापसा : मुशीरवाडा, कोलवाळ येथे काम देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन बिहारमधील एका युवकाची सुरीचा धाक दाखवून दोघांकडून लुबाडणूक करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी संशयित आरोपी सुभाष मयाराम कुमार (२९, रा. करासवाडा व मूळ उत्तरप्रदेश) याला अटक केली आहे. तर फरार असलेल्या संशयिताचा शोध पोलीस घेत आहे. संशयित सुभाष हा मार्रा-पिळर्ण येथील दरोडा प्रकरणातील एक आरोपी आहे. सदर लुबाडणुकीचा प्रकार गेल्या शुक्रवारी सायं. ४.३० च्या सुमारास घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित कुमार (१८ रा. हणजूण व मूळ बिहार) हा कामाच्या शोधात गोव्यात आला होता. बागा-कळंगुट मार्गावरील बसमध्ये त्याची दोन संशयितांशी ओळख झाली. त्यांनी काम मिळवून देण्याचे आश्वासन देत त्याला कोलवाळ येथील मुशीरवाडा परिसरातील तिलारी कालव्याजवळील निर्जनस्थळी नेले. तेथे त्याला मारहाण करून सुरीचा धाक दाखवत सुमारे १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच मोबाईलद्वारे त्याच्या बँक खात्यातील ९,५०० रुपये अज्ञात व्यक्तीच्या खात्यात वर्ग करण्यात आले. अशा प्रकारे एकूण २७,५०० रुपयांचा ऐवज लुटण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी शनिवारी सुभाष कुमार याला अटक केली. त्याला म्हापसा न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार साथीदाराचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक संजित कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र साटेलकर पुढील तपास करत आहेत.
मार्रा-पिळर्ण दरोडा प्रकरणातीलही आरोपी
सुभाष कुमार हा मार्रा-पिळर्ण येथे १७ मार्च २०२५ मध्ये घडलेल्या २४ लाखांच्या सशस्त्र दरोडा प्रकरणातील आरोपी असून, त्या गुन्ह्यात तो सध्या जामिनावर होता. त्या प्रकरणात नऊ जणांनी मार्रा-पिळर्ण येथील पप्पू बिश्वास या मासळी व बिडी वितरकाच्या घरावर दरोडा टाकून मोठ्या प्रमाणात ऐवज लुटला होता.