सां जुझे दी अरियाल येथील घटना

मडगाव : सां जुझे दी अरियाल येथे पाच दिवसांच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातून पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पाच दिवसांच्या या मुलाला मृत अवस्थेतच इस्पितळात आणण्यात आले होते. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मुलाचे वडील दत्तात्रय शिवाजी कागिणकर (३२) यांनी सांगितले की, मध्यरात्री आईने बाळाला दूध पाजले होते आणि त्यानंतर बाळ झोपले होते. त्यानंतर पहाटे २ वाजता आणि पुन्हा ४ वाजण्याच्या सुमारास आईने बाळाला दूध पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाळाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
पालकांनी बाळाला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात आणले. यावेळी वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. मायना कुडतरी पोलीस उपनिरीक्षक सागर कामत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.