फोंडा पोलिसांकडून भामट्याला दिल्लीत अटक : दोन दिवसांची पोलीस कोठडी

फोंडा : फोंडा येथे एका लग्न झालेल्या जोडप्याला हनिमूनला नेण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी सोनू उपेंद्र प्रसाद (दिल्ली) याला दिल्लीहून ताब्यात घेऊन अटक केली आहे. अटक केलेल्या संशयिताला न्यायालयाने २ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोहन गावडे, उपनिरीक्षक बन्सल नाईक व इतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
फोंडा परिसरातील मे महिन्यात नवीन लग्न झालेल्या जोडप्याने हनिमून जाण्यासाठी ऑनलाईन बुकिंग केले होते. त्यावेळी २ लाख ६७ हजार रुपये ऑनलाईन जमा करण्यात आले होते. पण, रक्कम जमा केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची माहिती जोडप्याला मिळाली. त्यामुळे जून महिन्यात फोंडा पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल करण्यात आली होती.
उपनिरीक्षक बन्सल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलिसांनी दिल्ली येथे जाऊन संशयिताला ताब्यात घेतले. बुधवारी सकाळी फोंडा पोलिसांनी संशयिताला अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता संशयिताला २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.