युती धर्माचे पालन करूनच योग्य वेळी घेणार निर्णय

पणजी : फोंडा तालुक्यात कुठूनही निवडणूक लढविण्यास मी तयार आहे. भारतीय जनता पक्षाशी मगोची युती आहे. युती धर्माचे पालन करून कुठून निवडणूक लढवावी याबाबत योग्य वेळी मी निर्णय घेईन, असे वीजमंत्री तथा मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे, तसतशा राजकीय घडामोडी वाढत आहेत. फोंडा मतदारसंघात मगोच्या कार्यात वाढ झाली आहे. याबाबत विचारले असता, सुदीन ढवळीकर यांनी हे उत्तर दिले. फोंडा हा मगोचा मतदारसंघ आहे. यामुळे मगोने फोंड्यात काम करण्यास सुरवात केलेली आहे, असे ते म्हणाले.
मीटर रीडरना कोणी घेतले याचा पाटकरांनी अभ्यास करावा
जे मीटर रीडर कंत्राटावर आहेत त्यांना सेवेत कोणी घेतले व केव्हा घेतले, याचा अभ्यास अमित पाटकर यांनी करण्याची गरज आहे. त्याना काँग्रेस सरकारनेच सेवेत घेतले आहे. काही जणांचे वय ४५ पेक्षा अधिक असल्याने त्यांना कायम करणे शक्य होणार नाही. सेवेत कायम करायचे असल्यास मंत्रिमंडळात तसा निर्णय घेणे आवश्यक आहे, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले.
माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी वीज खात्यावर मोर्चा नेत कंत्राटी मीटर रीडरना सेवेत कायम करण्याची मागणी केली होती. त्यावर वीजमंत्र्यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
वीज बिलांबाबतीत वीरेशने अभ्यास करावा
वीज बिलांबाबत आमदार वीरेश बोरकर यांनी अभ्यास करण्याची गरज आहे. ज्यांना आपल्या पक्षातील कारभार सांभाळता आला नाही, ते आता वीजबिल वा मीटर रीडरना नियमित करण्याच्या मागणीसाठी आंदोलने करीत आहेत. आंदोलने करणाऱ्यांनी अभ्यास करून बोलावे. वीरेश बोरकर यांनी माझ्याच मतदारसंघातील सीवेज प्रकल्पाला विरोध केला होता, असेही सुदिन ढवळीकर आमदार विरेश बोरकरबद्धल बोलताना म्हणाले.