वास्को : स्थानिक नागरी समस्या सोडवण्यासाठी सरकारी मंजुरी आणि निधीच्या प्रदीर्घ प्रक्रियेची वाट न पाहता थेट कृती करण्याचे उदाहरण सांकवाळीत पाहायला मिळाले आहे. माजी उपसरपंच आणि विद्यमान सांकवाळी पंच डेरिक वालेस यांनी उपासनगर येथील महालक्ष्मी रेसिडन्सी परिसरात स्वतःच्या खर्चातून पेव्हर्स बसवण्याचे काम पूर्ण केले आहे. या उपक्रमामुळे सरकारी तिजोरीवर कोणताही अतिरिक्त बोजा न पडता परिसरातील सुमारे ८० कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उपासनगरमधील अरुंद रस्त्यामुळे स्थानिक रहिवाशांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः आणीबाणीच्या काळात रुग्णवाहिका परिसरात पोहोचताना मोठी कसरत करावी लागत होती. तसेच सायकल चालवणाऱ्या लहान मुलांनाही या अरुंद भागातून ये-जा करताना त्रास होत होता. महालक्ष्मी रेसिडन्सीचे सचिव दीपक सावंत यांनी या परिस्थितीकडे लक्ष वेधताना सांगितले की, या कामाचा फायदा परिसरातील जवळपास ८० घरांना होणार आहे. पेव्हर्स बसवून रस्ता रुंद केल्यामुळे आता रहिवाशांची ये-जा अधिक सोयीस्कर झाली असून वाहतुकीची कोंडीही कमी होण्यास मदत झाली आहे.
माध्यमांशी बोलताना डेरिक वालेस यांनी स्पष्ट केले की, एका रहिवाशांनी पेव्हर्स बसवण्याची मागणी केल्यानंतर त्यांनी हे काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. प्रशासकीय सोपस्कार आणि मंजुरीच्या चक्रात लोकांना अडकवून ठेवण्यापेक्षा त्यांच्या खऱ्या गरजा तातडीने पूर्ण करणे महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. स्वतःच्या साधनांचा वापर करून हे काम पूर्ण केल्याचे सांगत त्यांनी भविष्यातही परिसरातील अशाच विकासकामांना पाठबळ देत राहण्याची ग्वाही दिली.


