म्हापसा : पर्वरी येथील निओ मॅजेस्टिक कॅसिनोमध्ये २५ बनावट गेमिंग चिप्सच्या माध्यमातून जुगार खेळत कॅसिनो कंपनीला ६.२५ लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी खडे बाजार, हुकेरी-बेळगाव मधील संशयित आरोपी आयुब चौधरी (४९) व जावेद अन्वर उचगावकर (४५) यांना अटक केली.
हा फसवणुकीचा प्रकार दि. २१ रोजी रात्री ९.३० ते दि. २२ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत आणि दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वा. दरम्यान निओ मॅजेस्टिक कॅसिनोमध्ये घडला होता. याप्रकरणी गोल्डन पीस हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी ऋग्वेद आमोणकर यांनी पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल केली.
सतत तीन दिवस बनावट गेमिंग चिप्सच्या माध्यमातून पाच जणांच्या एका ग्राहक गटाकडून जुगार खेळला जात असल्याचा प्रकार निओ मॅजेस्टिक कॅसिनोच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला होता. या बनावट गेमिंग चिप्सच्या माध्यमातून संशयित ग्राहकांनी ६ लाख २५ हजार रुपयांचे कंपनीचे नुकसान केले होते. त्यानुसार, सदर गटावर या कर्मचाऱ्यांनी लक्ष ठेवले होते.
मंगळवार, २४ रोजी सायंकाळी ६ वाजता संशयित गट हा बनावट गेमिंग चिप्सच्या आधारे जुगार खेळत असताना कॅसिनो कर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. त्यापूर्वी पाचपैकी एकजण तिथून निसटला होता. नंतर याबाबतची माहिती पर्वरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले तेव्हा या फसवणुकीमागे आयुब चौधरी व जावेद उचगावकर हे असल्याचे आढळून आले. तर इतर तिघांची कॅसिनामध्येच संशयितांसोबत ओळख झाली होती. चौकशीनंतर पोलिसांनी आयुब चौधरी याला अटक केली तर त्या तिघांना सोडून दिले.
रात्री उशिरा संशयिताचा फरार साथीदार जावेद उचगावकर हा पणजी येथे एका ठिकाणी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३६(२), ३३८, ३४१(१), ६१ सहकलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संकेत तळकर हे करत आहेत.
आयुबला २ दिवसांची पोलीस कोठडी
संशयित आरोपी आयुब चौधरी याला म्हापसा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, संशयित जावेदला पोलीस गुरूवारी न्यायालयात हजर करणार आहेत. पोलिसांनी बनावट चिप्स जप्त केल्या आहेत.


