वाळपई : खाण व भूगर्भशास्त्र खात्याच्या पथकाने मलपण येथे चिरेखाणीवर छापा टाकला. या कारवाईत चिरे उत्खननासाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक मशीन, जेसीबी मशीन, ट्रक, जनरेटर आणि अन्य साहित्य मिळून एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
मलपण येथील सर्वे क्रमांक ९/१ या ठिकाणी सुरू असलेल्या चिरेखाणीवर खाण व भूगर्भशास्त्र खात्याच्या पथकाने छापा घालून ही कारवाई केली. भूगर्भशास्त्रज्ञ ओमकार नाईक गावकर आणि कनिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ यज्ञेश वझरकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. तेथे वापरण्यात येणारी चिरे कापण्याची मशीन, जनरेटर, जेसीबी मशीन, ट्रक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या संदर्भात पंचनामा करून जप्त केलेल्या मालमत्तेचा ताबा वाळपई पोलीस स्थानकाकडे देण्यात आला आहे. संबंधित सर्वे क्रमांकाच्या जमीनमालकावरही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मलपण येथील बेकायदेशीर चिरेखाणीचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी खाण व भूगर्भशास्त्र खात्याकडे या संदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीसोबत संबंधित चिरेखाणीच्या व्यवसायासंदर्भातील पुरावेही खात्याच्या अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आले होते. वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठिकाणी कारवाई झाली नाही, तर या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही पक्षाच्या शिष्टमंडळाने दिला होता.
अनेक ठिकाणी चिरेखाणी...
सत्तरी तालुक्यातील खोतोडा, नगरगाव, गुळेली, पिसुर्ले, भिरोंडा, सावर्डे, पर्ये आणि मोर्ले या भागांमध्येही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर चिरेखाणींचा व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. मलपण येथील छाप्यानंतर तालुक्यातील इतर चिरेखाणींचे काम बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मलपणसह आसपासच्या सर्व उत्खनन क्षेत्रांची पाहणी करून परवानगी असलेल्या आणि परवानगीशिवाय सुरू असलेल्या व्यवसायांची स्वतंत्रपणे तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.


