गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
अनुसूचित जमातीच्या (एसटी) लोकसंख्येची अधिसूचना जारी करण्यास अंतरिम स्थगिती देणारा गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. ही अंतरिम स्थगिती २४ डिसेंबरपर्यंत कायम ठेवतानाच, या याचिकेत गोवा सरकार आणि ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन’ यांना पक्षकार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने गोवा सरकार आणि ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन’ यांची बाजू ७ दिवसांच्या आत ऐकून घ्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाला या प्रकरणी अंतिम आदेश द्यावा लागणार आहे. केंद्र सरकारने गोवा विधानसभा एसटी आरक्षणाची अधिसूचना जारी केली असून, तिला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबर रोजी कायद्याच्या कलम ३ नुसार एसटी लोकसंख्येची अधिसूचना जारी करण्यास अंतरिम स्थगिती दिली होती. जुन्या आकडेवारीनुसार अधिसूचना काढणे योग्य नसून, सध्याच्या नवीन आकडेवारीवर आधारित अधिसूचना जारी व्हावी, असे मत उच्च न्यायालयाने नोंदवले होते.
उच्च न्यायालयाच्या या स्थगिती आदेशाविरोधात गोवा सरकार आणि ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन’ यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (एसएलपी) दाखल केली होती. या याचिकांवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशाची मुदत २४ डिसेंबरपर्यंत निश्चित केली आहे. त्यानंतर हा अंतरिम आदेश लागू राहणार नाही, त्यामुळे त्यापूर्वीच उच्च न्यायालयाला अंतिम निकाल द्यावा लागेल.
मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे एसटी आरक्षण प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन दिल्लीत सॉलिसिटर जनरल यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीला आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर, अनिवासी भारतीय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर, एसटी समाजाचे नेते गोविंद शिरोडकर, अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अॅड. प्रवीण फळदेसाई उपस्थित होते. या बैठकीतच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
गोव्यात मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना आणि केंद्रात वाजपेयी सरकारच्या काळात गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाला एसटीचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात २०२५ मध्ये एसटी आरक्षण विधेयक संमत झाल्याने आरक्षणाची प्रक्रिया पुढे सरकली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर ‘उटा’ संघटनेनेही आक्रमक भूमिका घेतली असून, जनजागृतीसाठी एसटीबहुल मतदारसंघांमध्ये बैठकांचा धडाका सुरू केला आहे.
स्थगितीमुळे मतदारसंघ आरक्षण प्रक्रियेला खीळ
राज्य निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अहवालानुसार नुवे, सांगे, केपे आणि प्रियोळ हे ४ मतदारसंघ एसटी प्रवर्गासाठी आरक्षित होण्याचे निश्चित झाले आहे. जनसुनावणी घेऊन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मतदारसंघ आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध होण्याची अपेक्षा होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे या प्रक्रियेला खीळ बसली आहे. राज्य सरकार याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा करत असून, अधिसूचना जारी करण्याची जबाबदारी आयोगाचीच असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
उच्च न्यायालयात आज सुनावणी
गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातींच्या (एसटी) राजकीय आरक्षण देण्याच्या प्रक्रियेला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका देत जनगणना आयुक्तांनी एसटी समाजाच्या अंदाजित लोकसंख्येची कोणतीही अधिसूचना जारी करण्यास अंतरिम स्थगिती दिली होती. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. माजोर्डा येथील एडविन फर्नांडिस यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन फॉर शेड्युल्ड ट्राइब्स ऑफ गोवा’ या संघटनेनेही हस्तक्षेप केला आहे. दरम्यान, या संदर्भातील सुनावणी बुधवारी होणार होती, ती आता गुरुवारी होणार आहे.


