आता सेवेच्या शेवटच्या दिवशी पदोन्नतीने होतील पोलीस निवृत्त!

पोलिसांना निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी पदोन्नती देऊन (एक रँक अधिक) त्या पदावर निवृत्त केले जाईल. यामुळे एएसआय असलेले पीएसआय, पीएसआय असलेले पीआय, तर पीआय असलेले डीवायएसपी पदावर निवृत्त होतील.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
आता सेवेच्या शेवटच्या दिवशी पदोन्नतीने होतील पोलीस निवृत्त!

पणजी : पोलिसांना निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी पदोन्नती देऊन (एक रँक अधिक) त्या पदावर निवृत्त केले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. यामुळे एएसआय असलेले पीएसआय, पीएसआय असलेले पीआय, तर पीआय असलेले डीवायएसपी पदावर निवृत्त होतील.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पणजी येथील ‘कॅप्टन ऑफ पोर्ट्स’ संकुलात गोवा पोलिसांसाठी नवीन वाहने आणि किनारपट्टी सुरक्षा व बचाव कार्यासाठी दोन बोटींना हिरवा झेंडा दाखवून त्यांचा शुभारंभ केला. हा उपक्रम गोवाभरातील पोलिसांची गतिशीलता, कार्यात्मक सज्जता आणि किनारपट्टी सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. मैदानी स्तरावर प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी, नव्याने दाखल झालेल्या ताफ्यात १५ ‘किया कॅरेन्स’ वाहने आणि ४० ‘हंटर’ मोटारसायकलींचा समावेश आहे. गस्त, क्षेत्रीय कर्तव्ये आणि आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरतील.
चालू वर्षात गोवा पोलिसांनी १४९ दुचाकी आणि ८० हलकी मोटार वाहने व इतर वाहने खरेदी केली आहेत. याशिवाय, किनारपट्टी सुरक्षेसाठी समाविष्ट केलेल्या दोन बोटींमुळे समुद्रकिनारे आणि नद्यांमधील गस्त तसेच बचाव कार्याला अधिक बळकटी मिळेल. पोलीस भरती आणि करिअरच्या संधींच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ५२ होम गार्ड्सना पोलीस दलात पदोन्नती मिळण्याबाबतची नियुक्तीपत्रे प्रदान केली. असा उपक्रम राबवणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे.
या कार्यक्रमाला पोलीस महासंचालक, पोलीस उपमहानिरीक्षक आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवू देऊ नका. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि सायबर फसवणुकीपासून सावध राहावे. सायबर फसवणूक झाल्यास १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. पर्यटकांची दिशाभूल करणाऱ्या किंवा त्रास देणाऱ्या दलालांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

बचावकार्यासाठीचा प्रतिसाद वेळ सुधारला!
पोलिसांचा तत्काळ मदत वा बचावकार्यासाठीचा प्रतिसाद वेळ १० मिनिटांवरून ७ मिनिटांवर आला आहे. आता हा वेळ आणखी कमी होणार आहे, असे पोलीस महासंचालक आलोक कुमार म्हणाले.

हेही वाचा
सर्व पहा