गोवन वार्ता प्रतिनिधी
फोंडा
उधळशे-साकोर्डा येथे मंगळवारी रात्री स्कूटरच्या स्वयंअपघातात निधी पाटील हिचा जागेवरच, तर गंभीर जखमी रावी गावकर हिचा गोमेकॉत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दोन्ही मुली साकोर्डा येथील हिराबाई तळावलीकर हायस्कूलमधील इयत्ता नववीच्या वर्गातील विद्यार्थिनी असून खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, रस्सीखेच व अन्य स्पर्धेत त्यांनी अनेक बक्षिसे प्राप्त केली होती. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे साकोर्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

निधी पाटील
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी रात्री उधळशे येथे वडापाव खाण्यासाठी दोन्ही मुली स्कूटरवरून जात होत्या. स्कूटर चालविणाऱ्या अल्पवयीन चालकाचे नियंत्रण गेल्याने स्कूटर रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडाला धडकली आणि साकवामध्ये कोसळली. या अपघातात निधी आणि रावी गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी निधी पाटीलला मृत घोषित केले. गंभीर जखमी रावी गावकर हिला अधिक उपचारांसाठी गोमेकॉत पाठवण्यात आले. गोमेकॉत उपचार सुरू असताना रात्री उशिरा रावीनेही अखेरचा श्वास घेतला.
कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेलविटो फर्नांडिस व अन्य कर्मचाऱ्यांनी अपघात स्थळावर जाऊन पंचनामा केला. बुधवारी सकाळी उत्तरीय तपासणी केल्यानंतर दोन्ही मुलींचे मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. बुधवारी दुपारी स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
निधी, रावीने विविध खेळांत दाखवली चमक
साकोर्डा येथील हिराबाई तळावलीकर हायस्कूलच्या मुलींच्या गटाने मंगळवारी जिल्हा पातळीवर रस्सीखेच स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले होते. त्या गटात मृत निधी पाटील व रावी गावकर यांचा समावेश होता. त्याचबरोबर यापूर्वी खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, रस्सीखेच व अन्य स्पर्धांमध्ये सहभागी होऊन हायस्कूलसाठी अनेक बक्षिसे पटकावली होती. दोन्ही मुलींचा अपघाती मृत्यू झाल्याने हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी यांना अश्रू अनावर झाले.


