श्री नागेश महारुद्र संस्थान; बांदिवडे

बांदिवडे येथील श्री नागेश महारुद्र संस्थान हे शंकराचे स्वयंभू जागृतस्थान आहे. इ.स. १४१३ च्या शिलालेखातून या मंदिराचे पुरातन महत्त्व स्पष्ट होते, तर येथे वर्षभर विविध धार्मिक उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरे होतात.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
श्री नागेश महारुद्र संस्थान; बांदिवडे

बांदिवडे येथील श्री नागेश मंदिर हे शंकराचे स्वयंभू जागृतस्थान आहे. तेथील शिवलिंगाची स्थापना पुरातनकाली झाली आहे. श्री नागेश पंचायतनात श्री लक्ष्मीनारायण, श्री गणपती, श्री रवळनाथ, श्री बेताळ या देवता आहेत. श्री नागेश देव बांदिवडे या गावी स्थापन आहेत. पणजी-बेळगाव हमरस्ता क्र. ४ अ वरील फर्मागुडीपासून ८०० मीटर अंतरावर आहे. फोंडा या तालुका ठिकाणापासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर आहे.






आख्यायिका

बांदिवडे येथील श्री नागेश मंदिर हे शंकराचे स्वयंभू जागृतस्थान आहे. तेथील शिवलिंगाची स्थापना पुरातनकाली झाली आहे. शिवलिंग स्थापनेचा इतिहास उपलब्ध नाही. एका जानपद गीतात त्याचा उल्लेख पुढीलप्रमाणे आढळतो -

‘बांदिवडे गावात शमीची आळ।

त्यात जन्मला नागेश बाळ ।।’

या परिसरात पूर्वी शमीची झाडे होती. त्याला ‘नागझर’ नाव होते. एक गाय नियमितपणे तेथे जाऊन दुग्धधारा सोडत असल्याचे एका गुराख्याच्या नजरेस पडले. अशा रीतीने शिवलिंगाचा शोध लागला.




देवता

मंदिराचा परिसर अत्यंत रम्य असून तिन्ही बाजूंनी डोंगराच्या रांगा आहेत. चौथ्या बाजूने अघनाशिनी नदी वाहत आहे. गावाच्या मध्य भागातून एक ओढा बारमाही वाहत असून त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेते डोलताना दिसतात. डोंगरात अनेक निर्झर असून तेथे सुपारीच्या बागा किंवा कुळागरे आहेत. श्री नागेशाचे मंदिर लहान असून अत्यंत टुमदार आहे. श्री नागेश पंचायतनात श्री लक्ष्मीनारायण, श्री गणपती, श्री रवळनाथ, श्री बेताळ या देवता आहेत. गर्भागारात पिंडिकेसह शिवलिंग असून वर मेघडंबरी आहे. गर्भागाराभोवती प्रदक्षिणा मार्ग असून त्याच्यानंतर पलंगाची खोली आहे. समोर संगमरवरी फरशी बसविलेला प्रशस्त चौक असून दक्षिण व उत्तर बाजूला पं​चिष्ठ देवतांपैकी श्री लक्ष्मीनारायण व श्री गणपती यांच्या मूर्ती आसनस्थ आहेत. मंदिर पश्चिमाभिमुख असून समोर पुष्करिणी किंवा तलाव आहे.




जीर्णोद्धार

मंदिराचा जीर्णोद्धार शके १७०२ साली (इ.स. १७८०) श्री नारायण फोंडे कामत कुंभारजुवेकर यांच्या घराण्यातील दोन विधवा स्त्रिया (सासू व सून) यांच्या वतीने वडिये या कुंभारजुवेतील गृहस्थाने केला. शिवलिंगाचे उपासक कौशिक, वत्स व भारद्वाज गोत्री काही सारस्वत कुले असून त्यांचे ते कुलदैवत गणले जाते. मंदिर परिसरातील तीनही अग्रशाळा श्री नृपशालिवाहन शके १७०३ प्लवनाम संवत्सरी नवीन बांधल्या होत्या. वरील तीनही अग्रशाळांचा जीर्णोद्धार रा. पांडुरंग कामत पानवेलकर यांची विधवा गोपिकाबाई हिने शके १७९९ साली केला. त्याबद्दलचा उल्लेख लाकूड कामावर आहे. देवालयाच्या मागील बाजूच्या अग्रशाळेचा १९६५ साली जीर्णोद्धार झाला. त्याचा तळमजला नवीन पद्धतीने बांधण्यात आला. १९७० साली वरचा मजला पूर्ण करण्यात आला. या इमारतीत प्रत्येक मजल्यावर ७ गाळे आहेत. डाव्या बाजूची इमारत १९३७ साली बांधली होती. तेथे पूर्वी अश्वत्थाचा पार होता. उजव्या बाजूच्या इमारतीचा १९६५ साली जीर्णोद्वार करण्यात आला. देवालयाच्या मागील बाजूच्या जुन्या इमारतीच्या जागी १९७३ साली नवीन इमारत बांधण्यात आली. तिचे उद्घाटन २४ मार्च १९७४ रोजी झाले. डाव्या बाजूला नगारखाना आहे. 



पुरातन शिलालेख

हे मंदिर पुरातन असल्याचा नि:संदिग्ध पुरावा म्हणजे देवस्थानात असलेला शिलालेख. विजयनगर साम्राज्याचा वीर प्रताप देवराय महाराज या राजाच्या कारकीर्दीत शके १३३५ किंवा इसवी सन १४१३ साली गोमंतकांत नंजण गोसावी हा प्रतिहस्त असताना, माईन शेणवी वागळे यांनी वेदखंडीकेचे कुळागर, नागझरी मळो शेत व गोलती वाड्यावरील रूवो कुळागर, अशा जमिनी श्री नागेश देवतास दिल्याचा उल्लेख शिलालेखात आहे. कार्तिकी पौर्णिमेला देवालयात दीपमाळा लावावा, रात्री गंध, धूप, दीप, तांदुळाचा उपहार, वडे किंवा घारिया, शाक व विडा प्रतिवर्षी समर्पण करावा, अखंड ज्योत उभय देवतांजवळ लावावी, अशी आज्ञा या शिलालेखात आहे.




प्रमुख उत्सव

चैत्र शु. प्रतिपदा (गुढीपाडवा), श्रीराम जन्मोत्सव, चैत्र पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्मोत्सव, घटस्थापना, आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी : मखरोत्सव व रोज कीर्तन, विजयादशमी, त्रिपुरारी पौर्णिमा महोत्सव, कार्तिक व. प्रतिपदा : नौकारोहण, श्री पूर्वाचारी अवसराचे आगमन, दीपोत्सव (दिवजा), रथोत्सव, मार्गशीर्ष शु. दशमी : प्रतिष्ठापनोत्सव, मार्गशीर्ष पौर्णिमा : श्री दत्त जन्मोत्सव व शिबिकोत्सव, पौष अमावास्या : कालट, माघ शु. चतुर्थी : श्री गणेश जयंती, माघ शु. सप्तमी : रथसप्तमी, शिबिकोत्सव, माघ व. प्रतिपदा : शिबिकोत्सव, माघ व. द्वितीया : महारुद्र अनुष्ठान, माघ व. तृतीया : शतकलशाभिषेक, माघ व. चतुर्थी : महारुद्र अनुष्ठान, माघ व. पंचमी : महापूर्णाहूती, महानैवेद्य, विजयरथोत्सव, माघ व. चतुर्दशी : महाशिवरात्रोत्सव, माघ अमावास्या : गंगापूजन, पहाटे रथोत्सव, महारुद्र संतर्पण, शिबिकोत्सव, फाल्गुन व. प्रतिपाद : होळी, फाल्गुन व. पंचमी : रंगपंचमी व शिबिकोत्सव.

हेही वाचा
सर्व पहा