रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण: भाग १’ या भव्य चित्रपटाने ९९व्या अकादमी पुरस्कारांच्या (ऑस्कर २०२७) शर्यतीत दिमाखात प्रवेश केला आहे. सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स) विभागातील पहिल्या २० चित्रपटांच्या प्राथमिक यादीत (लाँगलिस्ट) या चित्रपटाने स्थान पटकावले आहे.
अकादमीच्या व्हिज्युअल इफेक्ट्स विभागाने पुढील फेरीसाठी निवड झालेल्या २० चित्रपटांच्या टीमला याबाबत कळवले आहे; मात्र अद्याप अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही. या २० चित्रपटांमधून अंतिम पाच चित्रपटांची शॉर्टलिस्ट १५ डिसेंबर रोजी जाहीर केली जाईल. ऑस्करसोबतच पुढील वर्षी होणाऱ्या ‘क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स’मध्येही सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स आणि सर्वोत्कृष्ट स्टंट डिझाइन या दोन विभागांत ‘रामायण’ची निवड झाली आहे.
या चित्रपटाचे व्हीएफएक्स काम आठ वेळा ऑस्कर विजेत्या ठरलेल्या ‘डीएनईजी’ या स्टुडिओने केले आहे. यापूर्वी या स्टुडिओने 'ड्यून', ‘इंटरस्टेलर’ आणि ‘इन्सेप्शन’ यांसारख्या जागतिक दर्जाच्या चित्रपटांसाठी काम केले आहे. नमित मल्होत्रा यांचा प्राईम फोकस स्टुडिओ, डीएनईजी आणि यश यांचे मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांनी संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
ऑस्करच्या टॉप २० यादीत ‘रामायण’समोर जागतिक स्तरावरील अनेक बड्या चित्रपटांचे आव्हान असणार आहे. यामध्ये ‘ड्यून: पार्ट थ्री’, ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’, ख्रिस्तोफर नोलन यांचा ‘द ओडिसी’, ‘प्रोजेक्ट हेल मेरी’, स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा ‘डिस्क्लोजर डे’, ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ आणि ‘सुपरगर्ल’ यांचा समावेश आहे. याशिवाय जपानी चित्रपट ‘गॉडझिला मायनस झिरो’ देखील या शर्यतीत आहे. यापूर्वी २०२३ मध्ये एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटानेही ९५व्या ऑस्करच्या व्हीएफएक्स विभागातील टॉप २० मध्ये स्थान मिळवले होते; मात्र अंतिम पाच नामांकनांमध्ये त्याला स्थान मिळवता आले नव्हते.
एकीकडे जागतिक स्तरावर कौतुक होत असताना दुसरीकडे ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘रामायण: भाग १’ची बॉक्स ऑफिसवरही घोडदौड सुरूच आहे. प्रदर्शित झाल्याच्या २०व्या दिवशी चित्रपटाने भारतात १७.५० कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. यासह चित्रपटाची भारतातील २० दिवसांची एकूण निव्वळ कमाई ९७२.९५ कोटी रुपये (ग्रॉस १,१६२.१५ कोटी रुपये) झाली असून, जगभरातील एकूण कमाईचा आकडा १,७३५.१५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.


